पाकिस्तानी पत्रकार नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असतात. आपल्या रिपोर्टींगमुळे तर कधी आपल्या निवेदनामुळे पाकिस्तानी पत्रकारांना सोशल मीडियावर ट्रोल केले जाते. मात्र, आता खुद्द अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनीच पाकिस्तानी पत्रकारांचे कौतुक केले आहे. त्यामुळे आश्चर्य होत आहे. पण, ट्रम्प यांचे हे शब्द कौतुकाचे आहेत, की टोला याबाबत अनेकजण विविध अर्थ काढत आहेत. दरम्यान, यापूर्वी अमेरिकेतील मीडिया भ्रष्टाचारी असल्याची टीका ट्रम्प यांनी केली होती.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी वॉशिंग्टन येथील व्हाईट हाऊसमध्ये जाऊन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान दोन्ही उभय देशांतील विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. दहशतवाद, व्यापार, अफगानिस्तान यांसह काश्मीरच्या मुद्द्यावरुनही ट्रम्प आणि इम्रान खान यांच्यात चर्चा झाली. त्यावेळी, पत्रकारांना प्रतिप्रश्न करत डोनाल्ड ट्रम्प यांनी आर यू फ्रॉम पाकिस्तान? असा सवाल केला. त्यानंतर मला पाकिस्तानी पत्रकार खूप आवडतात. मला 2-4 पाकिस्तानी पत्रकार हवे आहेत. मला पाकिस्तानी पत्रकार हे अमिरेकन पत्रकारांपेक्षा अधिक आवडतात, असेही ट्रम्प यांनी म्हटले. विशेष म्हणजे यावेळी, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हेही या पत्रकार परिषदेला संबोधित करत होते. त्यामुळे चक्क पाकिस्तानच्या पंतप्रधानांसमोरच ट्रम्प यांनी पाकिस्तानी मीडियाची खिल्ली उडवल्याच्या प्रतिक्रिया ट्विटर आणि सोशल मीडियावरुन व्हायरल होत आहेत. दरम्यान, जेमी मॅकलेलन या कॉमेडियनने ट्रम्प यांच्या या संवादाचा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. त्यावरही मजेशीर कमेंट पाहायला मिळत आहेत.
दरम्यान, काश्मीरप्रश्नी मध्यस्थी करण्यासाठी भारताने मदत मागितल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. मात्र, हा दावा भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने फेटाळून लावला आहे. तसेच काश्मीर प्रश्नासह भारत आणि पाकिस्तानमधील अन्य विवादांवर द्विपक्षीय चर्चेतूनच तोडगा काढला गेला पाहिजे, या आपल्या जुन्या भूमिकेचाही परराष्ट्र मंत्रालयाकडून पुनरुच्चार करण्यात आला. नरेंद्र मोदी आणि माझे चांगले संबंध आहेत, काश्मीर प्रश्नावर मोदींनी माझ्याकडे मदत मागितली होती. मलाही भारत आणि पाकिस्तानमधील या मुद्द्यावर मध्यस्थी करण्यास आवडेल, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. मात्र ट्रम्प यांचा हा दावा भारताने स्पष्ट शब्दात फेटाळला आहे.