जपानच्या हिरोशिमा शहरात G-7 शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी जागतिक नेत्यांची भेट घेतली आहे. याच दरम्यान, पंतप्रधान मोदी क्वॉड देशांच्या शिखर परिषदेत सहभागी झाले होते, ज्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन (US President Joe Biden), जपानचे पंतप्रधान फु मियो किशिदा आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान एंथनी अल्बानीज देखील उपस्थित होते.
बायडन आणि पीएम मोदी यांची भेट पुन्हा एकदा खास ठरली. मागच्या वेळेसारखाच बॉन्ड पाहायला मिळाला. दोन्ही नेत्यांनी एकमेकांना मिठी मारून शुभेच्छा दिल्या. ज्यो बायडन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भरभरून कौतुक केलं आणि अमेरिकेत तुमची लोकप्रियता खूप आहे. मला तुमचा ऑटोग्राफ हवा आहे, असं मोदींना सांगितलं.
परिषदे दरम्यान एक प्रसंग असा देखील आला जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान एंथनी अल्बानीज यांनी पंतप्रधान मोदींना त्यांच्या अजब आव्हानाबद्दल तक्रार केली. वास्तविक, जेव्हा मोदी, बायडन आणि अल्बानीज एकत्र होते, त्याच वेळी बायडन मोदींकडे आले आणि म्हणाले की, आजकाल त्यांना एका वेगळ्या प्रकारच्या आव्हानाचा सामना करावा लागत आहे.
ज्यो बायडन पंतप्रधान मोदींना म्हणाले, "तुमची पावलं लोकशाही महत्त्वाची असल्याचं दाखवत आहेत. तुम्ही माझ्यासाठी एक समस्या निर्माण करत आहात. पुढील महिन्यात आम्ही तुमच्यासाठी वॉशिंग्टनमध्ये डिनरचे आयोजन केले आहे. यासाठी पूर्ण देशातून प्रत्येकाला यायचं आहे. पण तिकिटं संपली आहेत. तुम्हाला वाटत असेल की मी मस्करी करतोय, पण माझ्या टीमला विचारा. मला अशा लोकांचे कॉल येत आहेत ज्यांच्याबद्दल मी यापूर्वी कधीही ऐकले नव्हते. चित्रपट कलाकारांपासून ते नातेवाईकांपर्यंत सर्वजण... तुम्ही खूप लोकप्रिय आहात." एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.