इस्लामाबाद: भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांनी आज(दि.25) त्यांची आई आणि पत्नीची भेट घेतली. तब्बल दीड वर्षांनंतर त्यांची कुटुंबीयांसोबत भेट झाली. इस्लामाबादस्थित पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयात जवळपास 40 मिनिटं ही भेट झाली. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयात या भेटीसाठी खास काचेच्या भिंतींची इंटरकॉम रुम तयार करण्यात आली होती. कुलभूषण जाधव हे काचेच्या एका बाजूला बसले होते, तर दुसऱ्या बाजूला त्यांची आई आणि पत्नी बसली होती. पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांचा कॉन्स्युलर अॅक्सेस दिला नसला तरी भारताचे पाकिस्तानमधील उप उच्चायुक्त जे.पी. सिंह यांना हे संभाषण काचेतून पाहण्याची मुभा देण्यात आली होती. या भेटीनंतर कुलभूषण जाधव यांची आई व पत्नी लगेचच व्यावसायिक विमानाने भारताकडे रवाना झाले आहेत.
हेरगिरी व दहशतवादाच्या आरोपावरून जाधव यांना पाकच्या लष्करी न्यायालयाने देहदंडाची शिक्षा सुनावली आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने भारताच्या अपिलावरून मे महिन्यात शिक्षेला स्थगिती दिली होती. त्यामुळे जगभरात पाकिस्तानची चांगलीच नाचक्की झाली होती.
मी पाकिस्तान सरकारचा आभारी- जाधव
या भेटीनंतर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्रालयाने पत्रकार परिषद घेऊन भेटीनंतरचा एक व्हिडीओ जारी केला आहे. या व्हिडीओत कुलभूषण जाधव यांनी पाकिस्तान सरकारचे आभार मानले आहेत. आई आणि पत्नीला भेटू द्यावं अशी विनंती मी पाकिस्तानच्या सरकारकडे केली होती. माझी विनंती मान्य केल्याबद्दल मी पाकिस्तान सरकारचे आभार मानतो असं या व्हिडीओत कुलभूषण जाधव म्हणताना दिसत आहेत.
दहा मिनीटं भेट वाढवली -
30 मिनिटांची भेट ठरली होती, पण भेट संपायला आली असताना कुलभूषण आणि त्याच्या आई-पत्नीने थोडा वेळ आणखी देण्याची विनंती केली. त्यावर त्यांची विनंती मान्य करत दहा मिनीटं वेळ वाढवण्यात आली अशीही माहिती पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली.
ही शेवटची भेट नाही -
कुलभूषण जाधव यांची त्यांच्या नातेवाईकांसोबतची ही शेवटची भेट म्हणावी का असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, या भेटीला शेवटची भेट म्हणता येणार नाही, ही पूर्णपणे केवळ मानवतेच्या दृष्टीने झालेली भेट होती. असं सूचक वक्तव्य पाकिस्तानच्या पररराष्ट्र मंत्रालयाकडून करण्यात आलं आहे.
सीएनएन न्यूज 18 ने कुलभूषण जाधव यांचा हा व्हिडीओ शेअर केला आहे.
तात्काळ फाशीचा धोका नाही, पाकिस्तानची माहिती-आई आणि पत्नीला दिलेली भेटीची संधी ही शेवटची संधी ठरणार नाही, अशी माहिती पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते डॉ. मोहम्मद फैसल यांनी यापूर्वी दिली आहे कुलभूषण जाधव यांच्या आई आणि पत्नीला त्यांच्या भेटीसाठी दिलेली परवानगी ही पूर्णपणे मानवतेच्या दृष्टीने देण्यात आली असून कुलभूषण जाधव यांना तात्काळ फाशीचा कुठलाच धोका नाही, असं गेल्या आठवड्यात झालेल्या साप्ताहिक बैठकीत डॉ.मोहम्मद फैसल यांनी म्हटलं. कुलभूषण जाधव यांची दया याचिका अजूनही प्रलंबित असल्यानं ही बाब स्पष्ट होते, असंही ते म्हणाले. कुलभूषण जाधव यांची त्यांच्या कुटुंबीयांशी भेट झाल्यावर त्यांना तात्काळ फाशी देण्यात येईल का ? यांसारख्या प्रश्नावर मोहम्मद फैसल यांनी उत्तरं दिली आहेत. कुलभूषण जाधव यांच्या आईला आणि पत्नीला भेटीसाठी देण्यात आलेली संधी ही इस्लामी परंपरेनुसार पूर्णपणे मानवतेचा विचार करुन देण्यात आली आहे. पाकिस्तान सरकारने या दोघींनाही व्हिसा मंजूर केला आहे. त्यांची जाधव यांच्याशी पाकिस्तानातील परराष्ट्र मंत्रालयात भेट होणार आहे. यावेळी त्यांच्यासोबत भारतीय उच्चायुक्तांमधील एका प्रतिनिधीलाही जाण्याची परवानगी देण्यात येईल, असंही डॉ. फैसल यांनी म्हंटलं. पाकिस्तानकडून जाधव यांच्या आई आणि पत्नीला माध्यमांशी बोलण्याचीही परवानगी दिली जाणार आहे. या संदर्भात आम्ही भारताच्या निर्णयाची वाट पाहत असल्याचं फैसल यांनी सांगितलं.