नवी दिल्ली - सुप्रसिद्ध मॉडेल, लेखिका, अभिनेत्री आणि अमेरिकन टीव्ही पर्सनॅलिटी पद्मा लक्ष्मीने जवळपास 32 वर्षांनंतर आपल्या खासगी आयुष्यासंदर्भातील मोठा गौप्यस्फोट केला आहे. वयाच्या 16 व्या वर्षी बलात्कार झाल्याचा धक्कादायक खुलासा पद्मा लक्ष्मीने केला आहे.या घटनेसंदर्भात तिनं 'द न्यू यॉर्क टाइम्स'मध्ये खुले पत्र लिहिले आहे. आतापर्यंत या घटनेची वाच्यता कोठे का केली नाही, याबाबतची माहिती लक्ष्मीने या पत्राद्वारे दिली आहे.
आपल्या खुल्या पत्रात लक्ष्मीनं म्हटले आहे की, आकर्षक आणि सुंदर व्यक्तिमत्त्व असलेल्या एका 23 वर्षीय तरुणासोबत मी डेटिंग सुरू केले होते. डेटिंगच्या काही महिन्यानंतर नववर्षांच्या संध्याकाळी त्यानं माझ्यावर बलात्कार केला. या सर्व प्रकारावर आतापर्यंत मौन का बाळगलं, यावर पद्मा लक्ष्मीने खुले पत्र लिहून खुलासा केला आहे.
''जेव्हा मी सात वर्षांची होते तेव्हा सावत्र वडिलांच्या कोण्या एका नातेवाईकानं माझ्या पायांच्यामध्ये घाणेरड्या पद्धतीनं स्पर्श केला आणि माझा हात आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला होता. आईवडिलांकडे याची तक्रार केल्यानंतर मला भारतात आजी-आजोबांकडे रवाना करण्यात आले. या घटनेतून मला असा धडा मिळाला की, आपण जर अन्यायाविरोधात आवाज उठवला तर तुम्हाला बाहेरचा मार्ग दाखवला जातो'', असे लक्ष्मीनं पत्रात म्हटले आहे.
लक्ष्मीनं असंही लिहिलं आहे की, या घटनेमुळे माझ्यावर आणि विश्वास ठेवण्याच्या माझ्या क्षमतेवर वाईट परिणाम झाला. यासंदर्भात माझ्या साथीदारासोबत आणि मानसोपचारतज्ज्ञांसोबत बोलण्यासही मला कित्येक वर्षे लागली.
पद्मा लक्ष्मीनं मौन का सोडले? अमेरिकेतील सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीश पदासाठीचे उम्मेदवार ब्रेट केवेनॉ वर दोन महिलांनी लैंगिक शोषणाचा आरोप केल्याचे वृत्त समोर आले. यानंतर गेल्या कित्येक दशकांपासून अत्याचार सहन करणाऱ्या पीडितांच्या अन्यायाला वाचा फुटू लागली, याचदरम्यान पद्मा लक्ष्मीनंही आपली हकिकत सांगितली. पद्मा लक्ष्मीवर झालेल्या अत्याचाराची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही दखल घेतली. ''बलात्कारानंतर तुम्ही पोलिसांमध्ये तक्रार नोंदवायला हवी होती'', असे ट्विट ट्रम्प यांनी केले होते.
कोण आहे पद्मा लक्ष्मी?2003मध्ये 'बूम' सिनेमामध्ये कतरिना कैफसोबत दिसली होती. पद्मा लक्ष्मी प्रसिद्ध लेखिका, अभिनेत्री आहे. 2004 मध्ये लक्ष्मीनं लेखक सलमान रुश्दी यांच्यासोबत विवाह थाटला. पण त्याचं नाते फार काळ टिकू शकले नाहीत. 2007मध्ये या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.