वॉशिंग्टन : अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष व सत्ताधारी डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते जो बायडेन(Joe Biden) यांनी आपली उमेदवारी सोडण्यास नकार दिला आहे. 'मला खात्री आहे की, डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना पराभूत करण्यासाठी मीच सर्वात मजबूत उमेदवार आहे. जनता पुन्हा एकदा मला निवडून देईल,' असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. याशिवाय, आगामी निवडणूक लढवू नये, असा सल्ला देणाऱ्या आपल्या पक्षाच्या खासदारांना पत्राद्वारे सुनावले.
बायडेन यांच्या डेमोक्रॅटिक पक्षाचे(Democratic Party) नेते त्यांच्यावर अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर पडण्यासाठी दबाव टाकत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात निवडणूक लढण्यास बायडेन सक्षम नसल्याचे त्यांचे म्हणने आहे. पक्षाला देणगी देणारे काही उद्योगपतीही बायडेन यांच्या नावाचा विरोधत करत आहेत. विशेष म्हणजे, पक्षाचे नेते आणि माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामादेखील (Barack Obama) बायडेन यांच्या उमेदवारीला विरोध करत असल्याची माहिती आहे.
पण, आता जो बाडेन यांनी दोन पानी पत्र लिहून त्यांच्या पक्षाच्या खासदारांना कडक शब्दात सुनावले. नोव्हेंबरमध्ये रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना पराभूत करणे, हेच आपल्या पक्षाचे एकमेव कार्य आहे, यावर बायडेन यांनी जोर दिला. बायडेन पत्रात म्हणतात, निवडणुकीला अजून 119 दिवस बाकी आहेत. त्या ध्येयासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे लागेल. आता आपण एकत्र येण्याची, एकत्रित पक्ष म्हणून पुढे जाण्याची आणि डोनाल्ड ट्रम्प यांना पराभूत करण्याची वेळ आहे, असेही बायडेन म्हणाले.