Donald Trump Latest Update: अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे. ट्रम्प यांनी सोमवारी (२ डिसेंबर) म्हटले की, "गाझा पट्टीत ओलीस ठेवण्यात आलेल्या इस्रायली नागरिकांना जर २० जानेवारी रोजी होणाऱ्या शपथविधीपूर्वी सोडले नाही, तर मध्य पूर्वमध्ये विध्वंस करेन." ट्रम्प यांनी दिलेल्या धमकीची जगभरात चर्चा सुरू झाली आहे.
इस्रायलयच्या दाव्याप्रमाणे गेल्या वर्षी इस्रायलवर झालेल्या हल्ल्यावेळी हमासच्या अतिरेक्यांनी २५० पेक्षा अधिक लोकांना पकडून ओलीस ठेवले आहे. यात इस्रायली-अमेरिकन नागरिकही आहेत. अजूनही गाझा पट्टीत १०१ परदेशी आणि इस्रायली ओलीस नागरिक जिवंत असण्याचा अंदाज आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी; काय बोलले?
अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, "जर ओलिसांना २० जानेवारी २०२५ रोजीपर्यंत मुक्त करण्यात आले नाही, तर मध्य पूर्व मध्ये विध्वंस. त्या लोकांवर कठोर कारवाई केली जाईल, ज्यांनी माणुसकीविरोधात हे अत्याचार करत आहेत."
"ज्या लोकांनी हे कृत्य केले आहे, त्यांना अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठी शिक्ष दिली जाईल. जर योग्य वेळी कारवाई केली गेली नाही, तर अमेरिका अशी शिक्षा देईल, जी आजपर्यंत कोणालाही मिळाली नसेल", असा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे.
युद्ध थांबवण्याची मागणी
दरम्यान, दुसरीकडे हमासने ओलीस नागरिकांना सोडण्याच्या बदल्यात युद्ध थांबवण्याची आणि गाझा पट्टीतून इस्रायल सैन्य पूर्णपणे मागे घेण्याची मागणी केली आहे. पण, इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी "जोपर्यंत हमासचा पूर्णपणे खात्मा होत नाही, तोपर्यंत युद्ध सुरूच राहील", अशी भूमिका घेतलेली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान येण्याच्या दरम्यान, हमासकडून असे सांगण्यात आले की, ३३ ओलीस नागरिकांचा मृत्यू झाला आहे. हमासने हे नागरिक कोणत्या देशाचे होते, याबद्दल मात्र खुलासा केला नाही.