ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 6 - भारतीय बँकांचे हजारो कोटींचे कर्ज बुडवून पसार झालेला विजय माल्ल्याने चॅम्पिअन्स ट्रॉफीमधील भारत - पाकिस्तान सामन्याला उपस्थिती लावली आणि सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. रविवारी बर्मिंगहॅममध्ये भारत - पाकिस्तानदरम्यान पार पडलेल्या हायव्होल्टेज सामन्यात विजय माल्ल्या बिनधास्तपणे व्हीआयपी सेक्शनमध्ये बसून भारतीय संघासाठी चिअर करत होता. त्यानंतर भारताचे माजी फलंदाज सुनील गावस्कर यांच्यासोबतही विजय माल्ल्या चर्चा करताना दिसला. दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
सोशल मीडियावर चर्चेत आलेल्या माल्ल्याने यानंतर ट्विटरवरुन आपलं म्हणणं मांडलं. "भारत - पाकिस्तान सामन्यासाठी माझ्या उपस्थितीला मीडियाने खूप कव्हरेज दिला. भारतीय संघाला चिअर करण्यासाठी सगळ्या सामन्यांना उपस्थित राहण्याची माझी इच्छा आहे", असं सांगत माल्ल्याने आपण बिनधास्तपणे स्टेडिअममध्ये येऊन सामने पाहणार असल्याचं सांगत एकाप्रकारे आव्हानच देऊन टाकलं आहे.
Wide sensational media coverage on my attendance at the IND v PAK match at Edgbaston. I intend to attend all games to cheer the India team.— Vijay Mallya (@TheVijayMallya) June 6, 2017
यावेळी माल्ल्याने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचं कौतुकही केलं आहे. एकेकाळी विराट कोहली विजय माल्ल्यांची मालकी असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघातून खेळत होता. "वर्ल्ड क्लास प्लेअर, वर्ल्ड क्लास कॅप्टन आणि वर्ल्ड क्लास जेंटलमन", अशा शब्दांत माल्ल्याने विराटचं कौतुक केलं आहे.
भारत-पाक सामन्यादरम्यान विजय मल्ल्या आणि सुनिल गावस्कर यांची भेट झाल्याचे काही फोटो व्हायरल झाले . यावरून नेटिझन्सने विजय मल्ल्या आणि सुनिल गावस्करांचा चांगलाच समाचार घेतला आहे. मल्ल्यांच्या भेटीमुळे सुनिल गावस्करवर नेटीझन्सने नाराजी व्यक्त करताना टीकेची झोड उडवली आहे. विजय मल्ल्यांच्या भेटीवर सुनिल गावस्कर यांनी अद्याप मौन बाळगले आहे. यावर त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
World class player World class Captain World class gentleman @imVkohli . Bravo Virat.— Vijay Mallya (@TheVijayMallya) June 6, 2017
भारतातील बँकांचे जवळपास 9 हजार कोटी रुपये बुडवून माल्ल्या सध्या लंडनमध्ये वास्तव्यास आहे. एप्रिलमध्ये माल्ल्याला लंडनमध्ये अटक करण्यात आली होती त्यानंतर काही वेळातच त्याची जामिनावर सुटकाही करण्यात आली होती.
दरम्यान, दिल्लीतील विशेष न्यायालयाने परकीय चलन नियमन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी माल्ल्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढले होते. 2016 मध्ये विजय मल्ल्याने ब्रिटनमध्ये पळ काढला होता. माल्ल्याला पुन्हा भारतात आणण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरु होते. फेब्रुवारी 2017 मध्ये भारताने ब्रिटिश सरकारकडे मल्ल्याला भारताकडे सोपवावे अशी विनंती केली होती.केंद्र सरकारने विजय मल्ल्याचा पासपोर्टही रद्द केला होता.याशिवाय त्याच्याविरोधात एक हजार पानांचे आरोपपत्रही दाखल झाले आहे.