संयुक्त राष्ट्र : काश्मीर मुद्दा सोडविण्यासाठी भारत आणि पाकिस्तानमध्ये चर्चा सुरू करण्यास आपण प्रयत्नशील आहोत, असे संयुक्त राष्ट्रसंघाचे प्रमुख अँटोनियो गुतारेस यांनी म्हटले आहे.काश्मीर मुद्दा सोडविण्यास तुम्ही भारत-पाकमध्ये चर्चा सुरू करण्याचे प्रयत्न करीत आहात काय, असा प्रश्न येथील पत्रपरिषदेत गुतारेस यांना विचारण्यात आला. त्यावर ते हसत हसत म्हणाले, तुम्हाला काय वाटते, की मी पाकच्या पंतप्रधानांशी तीन वेळा आणि भारतीय पंतप्रधानांशी दोन वेळा चर्चा कशामुळे केली असेल? काश्मीरवरून भारत आणि पाकदरम्यानचा तणाव कमी करण्याचे प्रयत्न टाळत असल्याची टीका गुतारेस यांच्यावर होते. त्याला उत्तर देताना गुतारेस म्हणाले की, ज्या व्यक्तीवर काही न करण्याचे आरोप होतात त्याने अनेकांच्या भेटी घेऊन चर्चा केली आहे. पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्या पत्रकार परिषदेत त्यांना नियंत्रणरेषेवर भारत - पाकदरम्यान वाढता तणाव तसेच शस्त्रसंधी उल्लंघनाच्या घटनांबाबत प्रश्न विचारण्यात आले होते. तथापि, याबाबत गुतारेस यांंनी विस्ताराने काहीही सांगितले नाही. तथापि, काश्मीर मुद्दा सोडविण्यासाठी भारत-पाकदरम्यान आपण मध्यस्थाची भूमिका बजावू, असे कोणतेही संकेत त्यांनी दिले नाहीत. समस्येच्या सोडवणुकीसाठी संयुक्त राष्ट्रसंघप्रमुखांनी थेट हस्तक्षेप केलेला नाही, तर भारत-पाकने चर्चेद्वारे शांततामयरीत्या मार्ग काढण्याच्या आवाहनाचा पुनरुच्चार केला आहे.
भारत-पाकिस्तान चर्चेसाठी मी प्रयत्नशील
By admin | Published: June 22, 2017 2:03 AM