बशर-अल-असद यांची सत्ता उलथून टाकल्यानंतर सीरिया आता इस्लामिक बंडखोरांचा गट असलेल्या 'हयात तहरीर अल-शाम (एचटीएस)च्या ताब्यात गेला आहे. तर राष्ट्रपती बशर अल-असद आपल्या कुटुंबासह रशियाला पळून गेले आहेत. दरम्यान, अमेरिकेच्या हवाई दलाच्या बॉम्बर विमानांनी इस्रायलसहसीरियातील लष्करी तळांवर आणि रासायनिक शस्त्रांच्या कारखान्यांवर शक्तिशाली हवाई हल्ले करून ते नष्ट केले आहेत.
सीरियतील ही शस्त्रास्त्रे बंडखोरांच्या हाती पडण्याची भीती अमेरिका आणि इस्रायलला वाटत होती. यामुळे त्यांनी ही कारवाई केली. तर दुसरीकडे, इस्रायली सैन्याने सीरियाच्या सीमेतही प्रवेश केला आहे. 1974 च्या करारानंतर इस्त्रायलने सीरियाच्या भूमीवर पाऊल ठेवण्याची ही पहिलीच वेळ आहे. एवढेच नाही तर, इस्त्रायली सैन्याने गोलन हाइट्सजवळ 10 किमी सीरियन सीमेच्या आतील जमिनीवर कब्जा करून त्याचे बफर झोनमध्ये रूपांतर केले आहे. यासंदर्भात भाष्य करताना इस्रायलने आपल्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा हवाला दिला आहे. तसेच हे पाऊल काही काळासाठीच उचलण्यात आले असल्याचेही इस्रायलने म्हले आहे.
IDF कडून सीरियन भूमीवर मोठा विध्वंस -बशर-अल-असद यांनी देश सोडल्यानंतर, इस्रायली हवाई दलाने सीरियामध्ये प्रवेश केला आणि अनेक लष्करी ठिकाणांना लक्ष्य केले. इस्रायलच्या लष्करी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे हल्ले अत्यंत अत्यंत भीषण होते. यानंतर, रविवारी (08 डिसेंबर) इस्रायली लष्कराने इस्रायल-सीरिया सीमेवरील गोलन हाइट्समध्ये बफर झोन तयार केला आहे.
सीरियातील असद सत्तापालटानंतर, सीरियावरील इराणचा प्रभावही संपुष्टात आला आहे. यामुळे इस्रायलला मोठी संधी मिळाली आहे. आता इराणला सीरियामार्गे लेबनॉनमधील हिजबुल्लाहला शस्त्रास्त्रे पाठवणे शक्य होणार नाही.
IDF नं नष्ट केली सैन्य ठिकाणं -इस्रायली सैन्याने रविवारी (8 डिसेंबर) सीरियात घुसून त्यांची 7 लष्करी ठिकाणं पूर्णपणे उद्ध्वस्त केले. यात खलखला एअर बेस आणि मिलिटरी बेसचाही समावेश आहे. या हल्ल्यांमध्ये सीरियन लष्कराच्या लष्करी गुप्तचर कार्यालयाचे मोठे नुकसान झाले आहे. आयडीएफने दावा केला आहे की इराण सीरियामध्ये शस्त्रास्त्र कारखाना चालवत होता आणि त्यांचे तज्ज्ञही तेथे उपस्थित राहत होते.