इस्लामाबाद - भारतासह आशिया खंडातील बहुतांशा भागांमध्ये प्राचीन बौद्ध संस्कृतीच्या खुणा आढळत असतात. आपल्या शेजारील पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्येही प्राचीन बौद्धकालीन अवशेषांचे अद्याप अस्तित्व आहे. पाकिस्तानने नुकतीच सतराशे वर्षांपूर्वीची एक प्राचीन बौद्धमूर्ती जगासमोर आणली आहे. धार्मिक सदभावना वाढावी तसेच पाकिस्तानमधील पर्यटनास चालना मिळावी, या उद्देशाने ही बुद्धमूर्ती प्रकाशझोतात आणण्यात आली आहे. तेव्हाच्या अखंड भारतातील आणि आता पाकिस्तानमध्ये असलेल्या भामला प्रांतात 1929 साली बौद्ध संस्कृतीचा वारला असलेले अवशेष सापडले होते. दरम्यान, आता तब्बल 88 वर्षांनंतर हा ठेवा जगासमोर आणण्यात आला आहे. येथे आढळलेली बुद्धाची मूर्ती भग्नावस्थेत आहे. ही भव्यमूर्ती 14 मीटर (48 फूट) उंच आहे. ही मूर्ती कांजूर दगडात कोरलेली आहे. पाकिस्तानमधील विरोधी पक्षनेते इम्रान खान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात या मूर्तीचे अनावरण करण्याकत आले. "ही बुद्धमूर्ती इस तिसऱ्या शतकातील आहे. त्यामुळे ही जगातील सर्वात जुनी बुद्धमूर्ती ठरते, असे भामला पुरातत्त्वीय विभाग आणि संग्रहालयाचे संचालक अब्दुल समद यांनी सांगितले. बुद्धांसंदर्भातील 500 वस्तू आम्ही शोधल्या असून, त्यापैकी ही एक मूर्ती आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. मात्र या प्राचीन बुद्धमूर्तीच्या अनावरणाला विरोधाचा सामनाही करावा लागला होता. काही गटांनी महामार्ग रोखत या मूर्तीच्या अनावरणाचा निषेध नोंदवला होता. विरोध करणाऱ्यांमध्ये सत्ताधारी पाकिस्तान मुस्लिम लीग ( नवाझ) या पक्षाचे कार्यकर्तेही होते. देशातील गैर मुस्लीम वारशांचे जतन करण्याच्या सरकारच्या धोरणाचा विरोध करण्यासाठी पाकिस्तानमधील कट्टरवाद्यांकडून अल्पसंख्याक समुदायांना लक्ष्य केले जात आहे. दरम्यान, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी जानेवारी महिन्यामध्ये पाकिस्तानमधील प्राचीन हिंदू मंदिर असलेल्या कटास राड मंदिराचा जिर्णोद्धार केला होता.
पाकिस्तानने जगासमोर आणली सतराशे वर्षांपूर्वीची गौतम बुद्धांची मूर्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2017 4:28 PM