जेरुसलेम : “इस्रायल हमासला कोणतीही किंमत मोजून नष्ट करेल आणि यामुळे गाझातील लोकांना पॅलेस्टिनी सरकार मिळेल. राहता राहिला प्रश्न हिजबुल्लाचा. गाझातील परिस्थिती पाहून लेबनॉनच्या लोकांनी धडा घेतला पाहिजे. इस्रायलने १९६७ आणि १९७३ मध्ये दोन आघाड्यांवर युद्ध केले आणि शत्रूंचा पराभव केला होता. गरज पडल्यास यावेळीही तेच करू,” असे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचे वरिष्ठ सल्लागार मार्क रेगेव यांनी मंगळवारी स्पष्ट केले.
इस्रायल-हमास युद्धावर जेरुसलेमस्थित इस्रायल एशिया सेंटरने आयोजित केलेल्या चर्चासत्रात रेगेव यांनी अनेक बाबींवर प्रकाश टाकला. या ऑनलाइन चर्चासत्रासाठी लोकमत समूहालाही आमंत्रित करण्यात आले होते. प्रश्नांची उत्तरे देताना रेगेव म्हणाले की, इस्रायलने नेहमीच आपल्या अपयशातून धडा घेतला आहे. यावेळच्या गुप्तचर यंत्रणेच्या अपयशातूनही आम्ही शिकू, पण आता मुद्दा युद्धाचा आहे. हमासला युद्धविरामाच्या रूपाने थोडा दिलासा मिळवायचा आहे, पण तसे होणार नाही.
ते म्हणाले की, इस्रायलचे अरब जगाशी संबंध सुधारल्याने इराण अस्वस्थ झाला आहे. भारतातून युरोपमार्गे मध्यपूर्वेपर्यंत कॉरिडॉरचा प्रस्ताव आल्यानेही इराण नाराज आहे, पण हमासचा पराभव होईल आणि संबंधांचे नवे अंकुर फुलतील. कतार वगळता अरब जगतात हमाससाठी रडणारा कोणताही देश नाही. हमासविरुद्धचे हे युद्ध इस्रायलचे नाही तर शांततेवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे आहे. इस्रायलचा विजय हा खऱ्या अर्थाने गाझातील लोकांचा आणि अरब जगाचा विजय असेल.
लेबनॉनने धडा घ्यावा... रेगेव म्हणाले, लेबनॉनच्या लोकांना काय हवे आहे हे त्यांनी ठरवावे. तेथील लोकांनी गाझामधील परिस्थितीकडे पाहावे आणि त्यातून धडा घ्यावा. हिजबुल्ला आणि हमास हे जुळे भाऊ आहेत आणि जागतिक शांततेलाही धोका आहे. आम्हाला दोन आघाड्या उघडायच्या नसल्या तरी गरज पडली तर मागे हटणार नाही.