भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर सध्या मालदीव आणि श्रीलंका या दोन देशांच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री अली साबरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत. तसेच श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू सनथ जयसूर्या यांनीही त्यांचे आभार मानले आहेत.
श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री अली साबरी यांनी सांगितले की, आवश्यक वस्तूंची आयात करण्यासाठी बारताकडून मिळालेल्या भरभक्कम क्रेडिट लोनच्या मदतीमुळेच आम्ही आर्थिक स्थैर्याचे काही उपाय करण्यास सक्षम ठरलो आहोत, असं म्हटल्यास ते अतिशयोक्ती ठरणार नाही. त्यासाठी मी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो.
श्रीलंका २०२२ च्या सुरुवातीपासून गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे. भारताने गेल्या वर्षी कठीण काळात श्रीलंकेला सुमारे ४ अब्ज डॉलरची आर्थिक मदत केली होती. त्याशिवाय भारताने श्रीलंकेला ९० कोटी अमेरिकन डॉलर एवढं कर्ज दिलं होतं.
दोन देशांच्या अधिकृत दौऱ्यादरम्यान एस. जयशंकर हे मालदिवचा दौरा केल्यानंतर गुरुवारी श्रीलंकेमध्ये पोहोचले होते. तिथे त्यांनी राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांच्यासह वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली. त्याशिवाय त्यांनी श्रीलंकेच्या परराष्ट्रमंत्र्यांसोबत परस्पर आणि प्रादेशिक हितसंबंधांशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा केली.