NATO चा हल्ला झाला, तर सर्वात पहिले 'खाक' होणार 'हे' देश, रशियाची खुली धमकी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 15:43 IST2025-04-15T15:42:53+5:302025-04-15T15:43:28+5:30
रशिया-युक्रेन युद्धा सुरू असतानाच रशिया आणि नाटो देशांमधील संघर्षही वाढताना दिसत आहे. अमेरिका आणि युरोपीय देश युक्रेनला आर्थिक, लष्करी आणि गुप्तचर मदत देत आहेत. यामुळे, रशिया याला नाटोचा थेट हस्तक्षेप मानत आहे.

NATO चा हल्ला झाला, तर सर्वात पहिले 'खाक' होणार 'हे' देश, रशियाची खुली धमकी!
रशिया आणि युक्रेन यांच्यात भीषण युद्ध सुरू असतानाच, व्लादिमीर पुतिन यांचे विशेष कमांडर तथा रशियन परराष्ट्र गुप्तचर संस्थेचे प्रमुख सर्गेई नारिश्किन यांनी पाश्चात्य देशांना मोठा इशारा दिला आहे. जर नाटोने रशिया अथवा जवळचा मित्र असलेल्या बेलारूसविरुद्ध कोणत्याही प्रकारची आक्रमक कारवाई केली, तर पोलंड आणि बाल्टिक देशांचा सर्वप्रथम विनाश होईल. रशियन वृत्तसंस्था आरआयएने यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध केले आहे. यामुळे, या भागातील भू-राजकीय तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.
काय म्हणाले नारिश्किन? -
नारिश्किन म्हणाले, "जर नाटोकडून रशिया अथवा बेलारूसविरुद्ध कोणतीही लष्करी कारवाई केली गेली, तर त्याचे परिणाम संपूर्ण नाटोला भोगावे लागतील. मात्र, सर्वात पहिले पोलंड आणि बाल्टिक देश बर्बाद होतील." नारिश्किन हे पुतिन यांच्या अत्यंत जवळचे आणि रशियन गुप्तचर विभागातील सर्वात शक्तिशाली चेहऱ्यांपैकी एक मानले जातात. त्यांच्या या विधानाचा अर्थ म्हणजे, रशिया पाश्चात्य युतीच्या कोणत्याही संभाव्य हस्तक्षेपाचा सामना करण्यास तयार आहे.
पोलंड आणि बाल्टिक देशच निशाण्यावर का? -
पोलंड आणि अॅस्टोनिया, लातविया आणि लिथुआनिया सारखे बाल्टिक देश NATO चे सदस्य आहेत आणि रशियाच्या पश्चिमेकडील सीमेला लागून आहेत. गेल्या काही दिवसांत त्यांनी रशिया विरोधी भूमिका घेत युक्रेनला समर्थन दिले आहे. तसेच रशिया या देशांना "नाटो फॉरवर्ड आउटपोस्ट" मानतो.
युक्रेन युद्ध आणि पाश्चात्य हस्तक्षेप -
रशिया-युक्रेन युद्धा सुरू असतानाच रशिया आणि नाटो देशांमधील संघर्षही वाढताना दिसत आहे. अमेरिका आणि युरोपीय देश युक्रेनला आर्थिक, लष्करी आणि गुप्तचर मदत देत आहेत. यामुळे, रशिया याला नाटोचा थेट हस्तक्षेप मानत आहे.