न्यूयॉर्क - भारतीय नागरीक कुलभूषण जाधव यांच्या बदल्यात दुस-या एका दहशतवाद्याला पाकिस्तानच्या ताब्यात देण्याचा प्रस्ताव आहे. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री खाव्जा असिफ यांनी न्यूयॉर्कमध्ये ही माहिती दिली. कुलभूषण जाधव पाकिस्तानीत तुरुंगात बंद आहेत. 2014 साली पेशावरमधील लष्करी शाळेवर झालेल्या हल्ल्यातील एक दहशतवादी अफगाणिस्तानातील तुरुंगात बंद आहे.
या दहशतवाद्याचे पाकिस्तानला हस्तांतरण करण्याच्या बदल्यात कुलभूषण जाधव यांना अफगाणिस्तानकडे सोपवावे लागेल असे ख्वाजा असिफ यांनी सांगितले. असिफ यांनी अफगाणिस्तानच्या ताब्यात असलेल्या त्या दहशतवाद्याचे नाव उघड केलेले नाही. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी हा प्रस्ताव दिल्याचे त्यांनी सांगितले.
पेशावरमध्ये लष्करी शाळेवर झालेल्या हल्ल्यातील एक दहशतवादी अफगाणिस्तानच्या ताब्यात आहे. कुलभूषण जाधव यांना अफगाणिस्ताकडे सोपवल्यास आपल्याला हवा असलेला दहशतवादी मिळू शकतो असे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी मला सांगितले. न्यूयॉर्कमध्ये आशिया सोसायटीच्या कार्यक्रमात असिफ यांनी हे वक्तव्य केले.
पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने कुलभूषण जाधव यांना हेरगिरी प्रकरणी दोषी ठरवून त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांच्यावर भारतासाठी हेरगिरी करत असल्याचा ठपका ठेवला आहे. भारताने पाकिस्तानी न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात आंतरराष्ट्रीय कोर्टात दाद मागितली. भारताने दाखल केलेल्या याचिकेवर अद्याप अंतिम निकाल आला नसला तरी, आंतरराष्ट्रीय कोर्टाने पाकिस्तानला शिक्षेची अंमलबजावणी न करण्याचे आदेश दिले आहेत. कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसंबंधी आंतरराष्ट्रीय कोर्टात सुनावणी सुरु आहे.
'हाफिज सईदचा फायदा काहीच नाही, मात्र डोक्याला त्रास', दहशतवादी हाफिज सईद आणि लष्कर-ए-तोयबा आमच्यासाठी आणि दक्षिण आशियाई भागासाठी डोकेदुखी असल्याचं पाकिस्तानने मान्य केलं आहे. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री ख्वाजा आसिफ यांनी न्यूयॉर्कमधील एशिया सोसायटीच्या कार्यक्रमात बोलताना हे वक्तव्य केलं आहे. मुंबई 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदचा उल्लेख करताना ख्वाजा आसिफ यांनी सांगितलं की, 'सध्या तो घरकैदेत आहेत. मात्र आम्हाला अजून कडक कारवाई केली पाहिजे हे मान्य करायला हवं. पाकिस्तानात असे अनेक लोक आहेत जे
पाकिस्तानाच अडचणी असताना डोकेदुखी ठरु शकतात. या मताशी मी सहमत आहे'. यावेळी ख्वाजा आसिफ यांनी पाकिस्तानला दहशतवादाला संपवण्यासाठी अजून प्रयत्न करण्याची गरज असल्याचंही मान्य केलं. मात्र त्यासाठी अजून वेळ हवा असल्याचं त्यांनी सांगितलं. 'हाफिज सईद, लष्कर-ए-तोयबा आमच्यासाठी डोकेदुखी आहे, हे मला मान्य आहे. पण त्यांच्यापासून सुटका करुन घेण्यासाठी आम्हाला वेळ हवा आहे. त्यांचा सामना करण्यासाठी सध्या आमच्याकडे ताकद नाही', असं ख्वाजा आसिफ यांनी सांगितलं.