नवी दिल्ली- संयुक्त राष्ट्र अधिवेशनात पाकिस्तानला जशास तसे उत्तर देण्यासाठी भारताने कंबर कसली आहे. संयुक्त राष्ट्र अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करताना दहशतवाद हा मुद्दा प्रामुख्याने चर्चेला येणार आहे. तसेच पाकिस्तानकडून काश्मीर मुद्दा उचलला जाऊ शकतो त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने तयारी केली आहे. त्यामुळे जर संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानने काश्मीर मुद्दा काढला तर भारताकडून त्याला रोखठोक उत्तर दिलं जाणार आहे.
भारताचे प्रतिनिधी सैय्यद अकबरुद्दीन यांनी सांगितले की, संयुक्त राष्ट्र अधिवेशनाचा वापर पाकिस्तानकडून काश्मीर मुद्दा उचलण्यासाठी केला जाऊ शकतो. जर पाकिस्तानने आपल्या नापाक हरकती कमी केल्या नाही तर भारत पाकिस्तानला रोखठोक उत्तर देण्यास समर्थ आहे. पाकिस्तानच्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर भारताकडे तयार आहे.
भारत पाकिस्तानच्या रणनीतीला आपल्या पद्धतीने उत्तर देईल. काश्मीर हा भारताचा अंतर्गत मामला आहे. त्यामुळे कलम 370 रद्द करणे आणि जम्मू काश्मीरचं विभाजन करणे हा भारत सरकारचा निर्णय आहे. त्यामुळे हा निर्णय आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर कसा येऊ शकतो? काही देश अशाप्रकारे स्वत:ची प्रतिमा खालवण्याचं काम करत आहेत. मात्र आम्ही आमची प्रतिमा उंचावत आहोत असा टोला सैय्यद अकबरुद्दीन यांनी पाकिस्तानला लगावला आहे. तसेच यूएनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत त्यात इंटरनेट आणि सायबर यामाध्यमातून कशाप्रकारे दहशतवाद पसरविला जातो आणि त्याला कसं रोखलं जाऊ शकतं यावर चर्चा होईल. भारताने नेहमी दहशतवादाला आव्हान दिलं आहे असा विश्वास अकबरुद्दीन यांनी दिला.
दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काश्मीर मुद्दा संयुक्त राष्ट्र अधिवेशनात उचलणार असल्याचे संकेत दिले आहेत. 27 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अधिवेशनात भाषण आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान वारंवार भारताच्या विरोधात षडयंत्र रचत आहे. मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानला नेहमी तोंडघशी पडावं लागलं आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी संयुक्त राष्ट्र अधिवेशनात पाकिस्तान काश्मीर मुद्दा उचलणार असल्याचं सांगितले आहे.