अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी पुढील वर्षी निवडणूक होणार आहे. यासाठी रिपब्लिकन पक्षाकडून डोनाल्ड ट्रम्प यांना पर्याय म्हणून काही लोक अनिवासी भारतीय विवेक रामास्वामी यांना समर्थन देत आहेत. अशातच आता ट्रम्प समर्थक विखारी प्रचार करू लागले आहेत. ट्रम्प समर्थक रामास्वामी यांच्याविरोधात धर्माचा आधार घेत आहेत.
रामास्वामी विजयी झाल्यास अमेरिकेच्या राष्ट्रपती भवनात विचित्र हिंदू देवतांची चित्रे लावली जातील, असे पादरी हँक कुन्नेमन यांनी म्हटले आहे. नुकत्याच एका प्रवचनात कुन्नेमन यांनी रामास्वामी यांच्यावर त्यांच्या धर्मावरून अपप्रचार केला आहे. 'नव्या तरुणा'पासून धोका आहे. जर ती व्यक्ती प्रभु येशू ख्रिस्ताची सेवा करत नसेल, तर तुम्ही तुमच्या देवासोबत राहणार नाही, देव तुमच्यावर रागावेल, असे कुन्नेमन यांनी म्हटले आहे.
रामास्वामी राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले आणि व्हाईट हाऊसमध्ये गेले तर तिथे हिंदू देव-देवतांची छायाचित्रे असतील, असा इशारा कुन्नेमन यांनी दिला आहे. आम्ही काय करतोय? तुम्ही एखाद्या व्यक्तीला बायबल सोडून इतर शास्त्रावर हात ठेवू द्याल का? तुम्ही रामास्वामींना त्याच्या सर्व विचित्र देवतांना व्हाईट हाऊसमध्ये ठेवू द्याल का? असा सवालही त्यांनी केला आहे.
ती व्यक्ती प्रभु येशूवर विश्वास ठेवत नसेल तर एखाद्याची धोरणे शासनासाठी किती चांगली आहेत याने आपल्याला काही फरक पडत नाही, असेही कुन्नेमन याने म्हटले आहे. रामास्वामी यांचे विरोधक त्यांच्या धर्माचा वापर त्यांच्या विरोधात करू शकतात, असे न्यूयॉर्क टाइम्सनेदेखील एका वृत्तात म्हटले आहे.