ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि १३ - 'उरी' दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक करुन पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केल्याचे पाकिस्तानकडून वारंवार नाकारण्यात येत आहे. आता पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांनाही सर्जिकल स्ट्राईक झालेच नाही, अशी री ओढली आहे. ' 29 सप्टेंबरला भारताकडून कोणतेही सर्जिकल स्ट्राईक झालेला नाही. जर भारताकडून तशी कोणतीही कृती झाली असती, तर पाकिस्तानने त्याला चोख प्रत्युत्तर दिले असते' असे पाक उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी म्हटले आहे. तसेच , भारताकडे सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा म्हणून व्हिडिओ असल्याची बातमी देखील बनावट आहे, असेही ते म्हणाले. एका पाकिस्तानी चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केले.
'29 सप्टेंबरला नियंत्रण रेषेजवळ भारताकडून फक्त गोळीबार करण्यात आला होता, ज्यात पाकिस्तानचे दोन सैनिक मारले गेले. मात्र त्यानंतर पाकिस्तानने भारताच्या गोळीबाराला तात्काळ चोख उत्तर दिले. भारतीय सैनिकांनी नियंत्रण रेषा पार केली नाही. ' जर भारताकडून सर्जिकल स्ट्राईक झाला असता तर आम्ही त्याला चोख प्रत्युत्तर दिले गेले असते,' अशा शब्दांत त्यांनी पुन्हा सर्व वृत्त फेटाळून लावली. दरम्यान, सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा भारतीय लष्कराने केंद्र सरकारकडे सोपवला आहे. मात्र, देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून या कारवाईचा व्हिडीओ , फोटो अशी कुठलीही माहिती जाहीर न करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.