ऑनलाइन लोकमत
न्यूयॉर्क, दि. 25 - मुक्त व्यापार व्यवस्थेकडून अमेरिकेचा जो बंदिस्त व्यापार व्यवस्थेकडे प्रवास सुरु आहे त्यावर आरबीआयचे गर्व्हनर उर्जित पटेल यांनी चिंता व्यक्त करताना टीकाही केली आहे. अॅपल, सिसको आणि आयबीएम या जगप्रसिद्ध अमेरिकन कंपन्यांनी उत्तम प्रोडक्ट आणि जगभरातील प्रतिभावंतांना आपल्याकडे संधी दिली नसती तर, या कंपन्या आज कुठे असत्या ?, जगात त्यांचे स्थान काय असते ? असा सवाल उर्जित पटेल यांनी विचारला आहे.
मुक्त व्यापारी व्यवस्थेमध्ये जगाचे हित आहे असे उर्जित पटेल म्हणाले. जगातल्या महत्वाच्या अर्थव्यवस्थांमध्ये आपल्यापुरताच विचार करण्याची प्रवृती बळावत चालली आहे. त्यासंबंधी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना उर्जित पटेल यांनी अॅपल, आयबीएमचे उदहारण दिले. कोलंबिया युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ इंटरनॅशनलमध्ये व्याख्यानाच्या कार्यक्रमाला ते आले होते.
संरक्षणवादाची धोरण आडवी आली तर, देशात संपत्ती निर्माण करणा-यांवर त्याचा परिणाम झाल्यावाचून राहणार नाही असे पटेल म्हणाले. संरक्षणवादी धोरणांमुळे अमेरिका विकासाच्या मार्गावरुन भटकण्याचा धोका आहे असे पटेल म्हणाले.