मॉस्को : अण्वस्त्रांचा प्रसार रोखण्याच्या उद्देशाने झालेल्या करारातील आपला सहभाग थांबवत असल्याची घोषणा करून अमेरिकेने अण्वस्त्र चाचणी केली, तर रशियाही मागे राहणार नाही, असा इशारा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी दिला आहे.
रशिया आणि अमेरिकेने २०१०मध्ये ‘न्यू स्टार्ट’वर स्वाक्षरी केली होती. हा करार दोन्ही देशांद्वारे तैनात करता येणाऱ्या लांब पल्ल्याच्या आण्विक क्षेपणास्त्रांची संख्या मर्यादित करतो आणि अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम असलेल्या क्षेपणास्त्रांचा वापर मर्यादित करतो.युक्रेनबरोबरच्या युद्धाला एक वर्ष झाल्याच्या पार्श्वभूमीवर पुतिन यांनी मंगळवारी राष्ट्राला संबोधित करताना म्हटले की, रशिया अद्याप या करारातून पूर्णपणे माघार घेत नाही. अमेरिकेने पुन्हा अण्वस्त्रांच्या चाचण्या सुरू केल्यास रशियालाही तशी तयारी ठेवावी लागेल.
पाश्चात्त्यांनीच संघर्ष भडकावला पुतिन यांनी त्यांच्या बहुप्रतीक्षित भाषणात रशिया आणि युक्रेनला पश्चिमेच्या दुटप्पीपणाचा “बळी” म्हणून वर्णन करत युक्रेन नव्हे तर रशिया आपल्या अस्तित्वासाठी लढत आहे, असा दावा केला. “आमचे युक्रेनच्या लोकांशी युद्ध नाही. कीव्हच्या राजवटीने युक्रेनला ओलिस ठेवले आहे आणि पाश्चात्त्य देशांनी प्रभावीपणे देशाचा ताबा घेतला आहे, असे ते म्हणाले. आपल्या संबोधनात, पुतिन यांनी वारंवार युद्ध योग्य ठरवले आणि युक्रेनमधील व्यापलेल्या प्रदेशातून सैन्य मागे घेण्याचे आंतरराष्ट्रीय आवाहन फेटाळले. रशिया प्रत्युत्तर देण्यास तयार आहे, असा इशाराही त्यांनी दिला.
रशियाला पराभूत करणे अशक्यपुतीन म्हणाले की, पाश्चात्य देशांना माहीत आहे की रशियाला युद्धभूमीवर पराभूत करणे अशक्य आहे, म्हणून ते ऐतिहासिक तथ्ये चुकीच्या पद्धतीने मांडून प्रचार हल्ले सुरू केले. युद्ध योग्यच असल्याचे सांगत पुतिन म्हणाले की, त्यांचे सैन्य युक्रेनच्या प्रदेशात नागरिकांचे संरक्षण करत आहे. आम्ही लोकांच्या जीवनाचे, रक्षण करत आहोत.
युक्रेन युद्धाच्या आगीत तेल ओतू नका : चीनबीजिंग : रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष संपविण्यासाठी आपला देश भूमिका बजावू इच्छितो, परंतु पाश्चिमात्य देशांनी युद्धाच्या आगीत तेल ओतण्याचे काम करू नये, असे मत चीनचे परराष्ट्रमंत्री चिन गँग यांनी मंगळवारी व्यक्त केले. सुमारे एक वर्षापासून सुरू असलेले युद्ध वाढू शकते आणि नियंत्रणाबाहेर जाऊ शकते, याची चीनला चिंता आहे, असे गँग म्हणाले.