पोर्ट लुईस : सरकार निश्चित धोरणानुसार काम करणारे असेल तर भ्रष्टाचार रोखता येतो हे नुकत्याच झालेल्या कोळसा खाणींच्या लिलावातून दिसले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. अवघ्या २० कोळसा खाणींच्या लिलावातून दोन लाख कोटींपेक्षाही जास्त महसूल मिळाला असून आमच्या सरकारचा भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याचा ठाम निर्धार असल्याचे मोदी यांनी सांगितले.मॉरिशसची राजधानी पोर्ट लुईसमध्ये गुरुवारी मोदी यांचा नागरी सत्कार करण्यात आला, त्याला उत्तर देताना ते बोलत होते. दरम्यान, मोदी मॉरीशसच्या स्वातंत्र्यदिन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.ते म्हणाले,‘‘या खाणी मनमानी पद्धतीने वाटण्यात आल्या होत्या व ते वाटप शेवटी सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरविले. २०४ पैकी केवळ २० कोळसा खाणींचा लिलाव करण्यात आला व त्यातून आम्हाला २ लाख कोटींपेक्षाही जास्त महसूल मिळाला. आम्ही जर देशाचा कारभार धोरणांनुसार करू, कार्यक्षमतेने काम करू, तर भ्रष्टाचारी व्यवस्थेतून सुटका करून घेता येते.’’ भारताच्या धोरणात भारतीय महासागराला सर्वोच्च प्राधान्य असून ही वेळ संघटित होण्याची आहे, असे ते म्हणाले. या विभागात जगातील अन्य देशांचे स्पष्ट हितसंबंध आहेत, असे मोदी यांनी चीनचा थेट उल्लेख न करता म्हटले. भारतीय महासागर विभागात चीन आपले हितसंबंध जपण्यासाठी पावले टाकण्याची पार्श्वभूमी मोदी यांच्या या विधानाला होती. भारतीय महासागरात जोरदार संघटन करण्याची ही वेळ आहे व येत्या काळात आम्ही पूर्ण शक्तीने ते करू, असे मोदी म्हणाले. मॉरिशससाठी भारताने बनविलेल्या किनारा रक्षक जहाजाचे जलावतरण त्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. मोदी म्हणाले,‘‘या भागात राहणाऱ्यांची प्राथमिक जबाबदारी ही शांतता, स्थैर्य व समृद्धीने जगण्याची आहे; परंतु जगातील इतर देशांचे या भागात फार मोठे हितसंबंध आहेत.’’ १३०० टन वजनाचे हे जहाज आहे. हिंदीला समृद्ध बनविल्याबद्दल प्रशंसा हिंदी साहित्य समृद्ध बनविण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी मॉरिशसची प्रशंसा केली. (वृत्तसंस्था)