सिडनी, दि. 27 - राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आदेश दिला तर, पुढच्याच आठवडयात चीनवर अण्वस्त्र हल्ला करु असे विधान अमेरिकन नौदलाच्या पॅसिफिक फ्लीटचे कमांडर स्कॉट स्विफ्ट यांनी केले आहे. ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटीच्या सुरक्षा परिषदेत एका प्रश्नाला उत्तर देताना स्कॉट यांनी हे विधान केले. सध्या ऑस्ट्रेलियाच्या समुद्रात अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाच्या संयुक्त लष्करी कवायती सुरु आहेत. या कवायतींवर चीन लक्ष ठेऊन आहे.
प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एका विद्यार्थ्याने स्कॉट यांना तुम्हाला ट्रम्प यांनी आदेश दिला तर तुम्ही पुढच्या आठवडयात चीनवर अण्वस्त्र हल्ला कराल का ? असा प्रश्न विचारला. त्यावर स्कॉट यांनी 'हो नक्कीच' असे उत्तर दिले. अमेरिकन सैन्य दलातला प्रत्येक सैनिक परदेशी आणि देशांतर्गत शत्रूपासून अमेरिकन संविधानाचे रक्षण करण्याची शपथ घेत असतो. त्या शपथेचे पालन करण्यासाठी आमची नियुक्ती केली जाते असे स्कॉट यांनी सांगितले.
सध्या अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये सुरु असलेल्या लष्करी सरावात एकूण 36 युद्धनौका सहभागी झाल्या असून, यामध्ये अमेरिकेची विमानवाहू युद्धनौका यूएसएस रोनाल्ड रेगनही आहे. या सरावावर चीन नौदलाच्या बोटीकडून लक्ष ठेवले जात आहे. दक्षिण चीन समुद्राच्या मालकी हक्कावरुन दादागिरी करणा-या चीनचा शेजारच्या बहुतांश देशांबरोबर वाद सुरु आहे.
सिक्कीमच्या सीमेवर भारत आणि चीनचे सैन्य समोरासमोर उभे ठाकले असून, चीनकडून दररोज भारताला युद्धाची धमकी दिली जात आहे. उद्दामपणा करणा-या चिनी ड्रॅगनला रोखण्यासाठी काही दिवसांपूर्वी भारत, अमेरिका आणि जपानच्या नौदलाने बंगालच्या खाडीत एकत्र युद्ध सराव केला होता. या सरावात 44,570 टन वजनाची आयएनएस विक्रमादित्य (INS Vikramaditya) या युद्धनौकेसह भारत सहा ते सात युद्धनौका आणि पाणबुड्या सहभागी झाल्या होत्या. 2013मध्ये नौदलात सहभागी झाल्यानंतर पहिल्यांदाच आयएनएस विक्रमादित्य अशा प्रकारे युद्धाभ्यासात अन्य देशांसहीत सहभागी झाली होती.
अमेरिकेनं आपली एक लाख टन वजन असलेली यूएसएस निमित्ज (USS Nimitz) ही विशाल युद्धनौका उतरवली होती. तर जपान 27 हजार टन वजनी हेलिकॉप्टर कॅरीयर इझुमो आणि अन्य काही युद्धनौकांसहीत सहभागी झाली होती. विशेष म्हणजे 9 हेलिकॉप्टर घेऊन जाण्यास सक्षम असलेल्या या जपानी युद्धनौकेचा अॅन्टी सबमराइन वॉरफेअरसाठी (anti-submarine warfare) वापर केला जातो.