इस्लामाबाद - अमेरिकेनं दहशतवादी संघटना हक्कानी नेटवर्कविरोधात पुरावे दिल्यास आम्ही त्यांना नष्ट करू, असं विधान पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा आसिफ यांनी केलं आहे. अमेरिकेनं पुरावे दिल्यास आम्ही अमेरिकेसोबत हक्कानी नेटवर्कवर संयुक्त कारवाई करू, असंही आसिफ म्हणाले आहेत.
अफगाणिस्तानमध्ये अमेरिकी सैनिकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या हक्कानी नेटवर्कला पाकिस्तान सरकारचा पाठिंबा आहे. त्यामुळे अमेरिकेच्या आर्थिक सहाय्याच्या बळावर अमेरिकेच्याच सैनिकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरायचं, असा हा पाकिस्तानचा एकूण प्रकार होता. त्याला चाप लावण्याचा प्रयत्न ट्रम्प प्रशासन करत आहे. त्या पार्श्वभूमीवरच ख्वाजा आसिफ यांनी हे वक्तव्य केलं आहे.ते म्हणाले, आम्ही ट्रम्प प्रशासनातील वरिष्ठ अधिका-यांना पाकिस्तान हक्कानी नेटवर्कला आश्रय देत असल्याच्या पुराव्यानिशी येण्याचं आमंत्रण दिलं आहे. अमेरिकेनं पुरावे दिल्यास आमची सेना अमेरिकेसोबत मिळून हक्कानी नेटवर्क पूर्णतः उद्ध्वस्त करेल. पाकिस्तानचे सेना प्रमुख जनरल कमर जावेद बावजा या महिन्याच्या सुरुवातीला अफगाणिस्तानचा दौरा करणार आहेत. त्यावेळी ते राष्ट्रपती अशरफ गनी यांना भेटून असा प्रस्ताव देणार आहेत, अशी माहिती परराष्ट्र मंत्री ख्वाजा आसिफ यांनी दिली आहे.अमेरिकेनं केलेल्या टीकेवर आसिफ म्हणाले, ट्रम्प प्रशासनानं आमच्यावर दबाव टाकल्यास आमचे मित्र देश चीन, रशिया, इराण व तुर्की आमच्या बाजूने उभे राहतील. अमेरिकेचे संरक्षण आणि परराष्ट्र मंत्री आमच्यावर हुकूमशाही करत आहेत. आम्ही आमच्या देशाचं सार्वभौमत्व राखण्यासाठी सर्व उपाययोजना करू, असंही ख्वाजा म्हणाले आहेत.