नवी दिल्ली, दि. 22 - भारताच्या सीमेवरील इन्फ्रास्ट्रक्चर आणि नेटवर्कमुळे आम्हाला धोका निर्माण होतोय असे कारण पुढे करुन उद्या आम्ही आमचे सैन्य घुसवले तर, खरोखरच भारतात अराजकता निर्माण होईल अशी धमकी चीनने आज दिली. डोकलाममधील रस्ते बांधणीमुळे भारताच्या अंतर्गत सुरक्षेला धोका निर्माण होईल हा भारताचा तर्कच हास्यास्पद असल्याचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
आम्ही कुठल्याही देशाला किंवा व्यक्तीला आमच्या प्रादेशिक अखंडतेवर अतिक्रमण करु देणार नाही असे चीनने म्हटले आहे. चीनच्या रस्ते बांधणीचे कारण पुढे करुन भारतीय सैन्य बेकायदापणे चीनच्या भूभागात घुसले आहे. मूळात भारताचा तर्कच हास्यास्पद ठरतो असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते ह्यु च्युनयिंग यांनी सांगितले.
दरम्यान आपल्या लष्करी ताकतीच्या बळावर चीन भले वारंवार युद्धाची गर्जना करत असेल, पण उद्या दोन्ही देशांमध्ये असे युद्ध भडकलेच तर चीनला त्यात कुठलाही फायदा होणार नाही. वरिष्ठ सरकारी पातळीवरील विश्लेषणातून ही बाब समोर आली आहे. डोकलामच्या चिघळत चाललेल्या संघर्षाचे उद्या युद्धात पर्यावसन झाले तर, चीनला प्रादेशिक आणि रणनितीक दोन्ही आघाडयांवर लाभ होणार नाही. फक्त दोन्ही बाजूला रक्तपात होईल.
या युद्धातून कोणीही विजेता किंवा पराभूत ठरणार नाही. उलट चीनला 1962 सारखा युद्धाचा निकाला लावता आला नाही तर, आशियातील चीनचे वर्चस्व संपून जाईल. अमेरिकेसमोर चीन दुबळा ठरेल. 62 च्या युद्धानंतर पाचवर्षांनी 1967 सालच्या सप्टेंबर महिन्यात चिनी लष्कराने नाथु ला आणि चाओ ला येथील भारतीय चौक्यांवर हल्ला केला होता. भारतीय लष्करासमोर त्यावेळी चिनी सैन्य पूर्णपणे निष्प्रभ ठरले होते. चीनचा हा हल्ला पूर्णपणे फसला होता. त्यामुळे चीन युद्धाचा धोका पत्करण्याची शक्यता कमीच आहे.
भारत आणि चीनची सीमा 3488 किलोमीटरमध्ये पसरली असून, युद्धामध्ये कोणा एकाला पूर्ण वर्चस्व मिळवता येणार नाही. डोकलामची भौगोलिक रचना लक्षात घेतली तर, भारताला वर्चस्व मिळवण्याची संधी आहे. सीमेवरच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये भारत चीनपेक्षा मागे असला तरी, युद्ध झालेच तर दोन्ही देशांच्या लष्कराचे नुकसान होईल.