वॉशिंग्टन : ‘माझ्या पुरोगामी बदलांच्या दृष्टिकोनाला आजही अमेरिकनांची पसंती असून, तिसऱ्या वेळेस अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्यास मी पात्र असतो, तर जिंकलो असतो,’ असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी केला. ओबामा म्हणाले, ‘या दृष्टिकोनाबद्दल मला आत्मविश्वास असून, मला जर तिसऱ्यांदा निवडणूक लढवायची संधी असती, तर मी बहुसंख्य अमेरिकनांना माझ्या पाठिशी उभे करू शकलो असतो.’ ओबामा यांनी त्यांचे माजी वरिष्ठ सल्लागार डेव्हिड अक्सेलरॉड यांना ‘द अॅक्स फाइल्स’ या पॉडकॉस्टसाठी मुलाखत दिली. मुलाखतीची निर्मिती युनिव्हर्सिटी आॅफ शिकागो इन्स्टिट्यूट आॅफ पॉलिटिक्स आणि सीएनएनची आहे. ओबामा म्हणाले, ‘देशभर लोकांशी माझे जे संभाषण झाले, भलेही त्यातील काही लोक माझ्याशी सहमत नव्हते, तरी तुमचा जो दृष्टिकोन आहे, जी दिशा तुम्ही दाखवत आहात ती बरोबर आहे, असे त्यांनी मला सांगितले.’ ५० मिनिटांच्या या मुलाखतीत ओबामा यांनी डेमोक्रॅट्सनी काही मतदारांकडे दुर्लक्ष केले व त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प हे विजयी झाले, हे वारंवार सूचित केले. आर्थिक व्यवस्थेचे लाभ आपल्याला झाले नाहीत, अशी भावना झालेल्या अमेरिकनांकडे हिलरी क्लिंटन यांच्या प्रचार मोहिमेने पुरेसा स्पष्ट युक्तिवाद केला नाही, असे ओबामा यांना सूचित करायचे होते. ‘जर तुम्ही मी जिंकणार असा विचार करीत असाल, तर खेळात होते तशी तुमच्यामध्ये ती भावना निर्माण होते. भलेही मग तुम्ही सुरक्षितपणेही खेळत असाल,’ असे ओबामा म्हणाले. ‘क्लिंटन यांनी अतिशय कठीण परिस्थितीत खूप चांगली कामगिरी केली व प्रसारमाध्यमांनी त्यांना चुकीची वागणूक दिली,’ असेही ओबामा यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)ट्रम्प यांचे प्रत्युत्तरओबामा यांनी मी अध्यक्षपदाची निवडणूक तिसऱ्यांदाही जिंकू शकलो असतो, हा केलेला दावा नियोजित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी खोडून काढला. ट्रम्प यांनी टिष्ट्वटरवर म्हटले की, ओबामा यांनी तसे म्हणावे, परंतु मी म्हणेन की ते कधीही शक्य नव्हते. संयुक्त राष्ट्र गप्पांचा क्लब संयुक्त राष्ट्रात खूप क्षमता आहे, पण हा एक क्लब बनून गेला आहे. हे दुर्भाग्य आहे.अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संयुक्त राष्ट्रावर टीका करताना म्हटले आहे की, संयुक्त राष्ट्र हा असा क्लब आहे, जिथे लोक भेटण्यासाठी, चर्चा करण्यासाठी आणि वेळ घालविण्यासाठी येतात. ट्रम्प यांनी टिष्ट्वट केले आहे की, संयुक्त राष्ट्रात खूप क्षमता आहे, पण हा एक क्लब बनून गेला आहे. हे दुर्भाग्य आहे. वेस्ट बँक आणि येरुशेलमच्या काही भागांत इस्त्रायलच्या प्रभावाबाबत संयुक्त राष्ट्र संघाने एक निषेध करणारा प्रस्ताव आणला आहे. या मतविभाजनात सहभागी न होण्याचा निर्णय अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी घेतला आहे. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांचे हे विधान आले आहे. ७१ वर्षे जुन्या या संस्थेलाच ट्रम्प आगामी काळात आव्हान देऊ शकतात, असे वॉशिंग्टन पोस्टने म्हटले आहे.
संधी असती तर तिसऱ्यांदाही जिंकू शकलो असतो : ओबामा
By admin | Published: December 28, 2016 2:24 AM