आपल्यापैकी कोणी इंजिनिअर असेल, कोणी डॉक्टर असेल किंवा कोणी आणखी कोणत्यातरी प्रोफेशनमध्ये असेल; पण तुम्हाला जर सांगितलं अशीही एक व्यक्ती आहे जी ‘फुलटाइम इटर’ आहे तर? होय, हे अगदी खरंय. हॅल्लो एव्हरीवन दिस इज मार्क विन्स... हे वाक्य कदाचित तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी ऐकलं असेल. या माध्यमातूनही कोणी पैसे कमावू शकत असेल, याचा अंदाजही कदाचित कोणाला नसेल.
मार्क विन्स हा मूळचा अमेरिकेचा; पण त्याचे आई-वडील चीनचे. त्यानं ॲरिझोना स्टेट युनिव्हर्सिटीमधून शिक्षण घेतलं. सध्या तो बँकॉकमध्ये राहतो. जगातील प्रत्येक देशात जाऊन त्या त्या ठिकाणच्या व्यंजनांचा आस्वाद घ्यायचा आणि ते लोकांपर्यंत पोहोचवायचं हेच त्याचं एकमेव काम. पदार्थ कोणताही असो तो कसा तयार केला जातो आणि त्याची चव काय, त्यात काय अपेक्षित होतं इथपर्यंत सर्व तो आपल्या व्हिडीओमधून मांडत असतो. केवळ मार्कच नाही, तर त्याची पत्नी आणि दोन मुलं हीदेखील त्याच्यासोबत अनेक देशांच्या दौऱ्यावर असतात. आता तुम्हाला प्रश्न पडेल की पदार्थ विकत घेण्यास आणि फिरण्यासाठी तर पैसे लागत असतील.. मग याची कमाई होते कुठून?
मार्कची बहुतांश कमाई ही यूट्युबकडूनच होते. प्रत्येक व्हिडीओच्या व्ह्यूजप्रमाणे त्याला त्याचे पैसे मिळतात. अनेकदा काही स्पॉन्सर्सही त्याच्या ट्रिपसाठी त्याला स्पॉन्सर करत असतात. काही रिपोर्ट्सनुसार मार्क विन्सचं नेटवर्क हे ४.७ मिलियन डॉलर्स म्हणजेच जवळपास ३७ कोटींच्या जवळपास आहे. तर त्याचं वार्षिक उत्पन्न जवळपास १.३ मिलियन म्हणजेच १३ कोटींच्या जवळपास आहे. त्याच्या चॅनलचं नाव ‘मायग्रेशनॉलॉजी’ असं असून, त्याच्या चॅनलवर ९.२१ मिलियन युझर्स आहेत. तुम्हीही आता विचार करून पाहा, असा काही पर्याय तुम्हालाही करिअर म्हणून सुचतोय का?
जयदीप दाभोळकर, लोकमत डॉट कॉम