इस्लामाबाद
कर्ज घेऊन दिवाळखोरीला उतरलेल्या पाकिस्तानला आता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं (IMF) जोरदार झटका दिला आहे. आयएमएफनं पाकिस्तानला १ अब्ज डॉलरचं कर्ज देण्यास नकार दिला आहे. आयएमएफची मनधरणी करण्यासाठी इम्रान खान सरकारनं वीज आणि पेट्रोल-डिझेलच्या किमतीत मोठी दरवाढ केली होती. तरीही जागतिक संघटनेला खुश करण्यात इम्रान यांना यश आलेलं नाही. आयएमएफनं कर्ज नाकारल्यामुळे आता इम्रान खान यांना पुन्हा एकदा चीन किंवा आखाती देशांसमोर झोळी पसरावी लागण्याची शक्यता आहे.
आयएमएफनं पाकिस्तान सरकारच्या बऱ्याच विनंतीनंतर उद्ध्वस्थ झालेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी ६ अब्ज डॉलरची मदत केली होती. याअंतर्गतच एक अब्ज डॉलरचा हफ्ता पाकिस्तानला दिला जाणार होता. पाकिस्तानी माध्यमांमधील वृत्तानुसार आयएमएफ आमि पाक सरकारमधील चर्चा सकारात्मक होऊ शकली नाही. आयएमएफकडून कर्ज मिळवण्यात इम्रान खान अपयशी ठरले आहेत. आयएमएफची मनधरणी करण्यासाठी पाकिस्तानचे वित्त सचिव बराच काळ वॉशिंग्टनमध्ये तळ ठोकून होते.
पाकिस्तानातील सर्वसामान्य नागरिक हवालदिलपाकिस्तानची वागणूक पाहता आयएमएफनं कर्ज देण्यास नकार दिल्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे. आयएमएफला खुश करण्यासाठी इम्रान खान सरकारनं गेल्या काही दिवसांत देशातील वीज दरांत १.३९ रुपये प्रति युनिट वाढ केली होती. तर पेट्रोलच्या दरात तब्बल १०.४९ रुपयांची आणि डिझेलच्या दरात तब्बल १२.४४ रुपायांची वाढ केली होती. पाकच्या या निर्णयामुळे आयएमएफ काही खूश झालेलं नाही. पण सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाला आहे. पाक सरकार पुन्हा एकदा वीजेच्या दरात आणखी दिड ते अडीच रुपये प्रतियुनिट वाढ करण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे.
प्रत्येक पाकिस्तानी नागरिकावर १ लाख ७५ हजारांचं कर्जपरदेशी कर्ज फेडून टाकण्याचं आश्वासन देऊन सत्तेत आलेलं इम्रान खान यांचं सरकार कर्ज फेडण्यासाठी आणखी कर्ज घेऊ लागलं आहे. नुकतंच पाकिस्तानच्या संसदेत इम्रान खान यांच्या सरकारनं याबाबतची कबुली दिली होती. पाकिस्तानातील प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावर आज १ लाख ७५ हजार रुपयाचं कर्ज आहे, अशी माहिती संसदेत देण्यात आली होती. यात इम्रान खान सरकारचं योगदान ५४,९०१ रुपये इतकं असून एकूण रकमेच्या ते ४६ टक्के इतकं आहे. पाकिस्तान नागरिकांवरील कर्जाचं हे ओझं गेल्या दोन वर्षांमध्ये वाढलं आहे. इम्रान खान सत्तेत आले त्यावेळी पाकिस्तानी नागरिकावरील कर्ज प्रत्येकी १,२०,०९९ रुपये इतकं होतं.