वाॅशिंग्टन : अमेरिकेची संसद असलेल्या ‘कॅपिटल’ इमारतीवर मावळते अध्यक्ष डाेनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी हल्ला चढविल्यानंतर ट्रम्प आणि त्यांच्या समर्थकांवर कठाेर कारवाई करण्याबाबत विचार सुरू आहे. ट्रम्प यांना अध्यक्षपदावरून तातडीने हटविण्याबाबत सर्व कायदेशीर मार्गांचा विचार करण्यात येत आहे. तसे न झाल्यास त्यांच्यावर महाभियाेग चालविण्याचा इशाराही प्रतिनिधी सभेने दिला आहे. तर दुसरीकडे अध्यक्षीय अधिकारांचा वापर करून डाेनाल्ड ट्रम्प हे स्वत:ला माफ करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
ट्विटरने भविष्यातही ट्रम्प यांच्याकडून चिथावणीखोर वक्तव्ये, दंगली केल्या जाण्याची शक्यता व्यक्त करत त्यांचे ट्विटर खाते कायमस्वरुपी बंद केले आहे.
कॅपिटल इमारतीवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी ट्रम्प यांच्यावर कडाडून टीका हाेत आहे. मात्र, काेणत्याही कारवाईपासून वाचण्यासाठी ट्रम्प हे अध्यक्षीय अधिकारांचा वापर करून स्वत:ला माफी देण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. याबाबत राजकीय आणि कायदेशीर परिणामांबाबत ट्रम्प यांनी काही तज्ज्ञांसाेबत चर्चा केली. स्वत:ला माफी देण्याचा अधिकार आहे का? याबाबत त्यांनी माहिती जाणून घेतली. स्वत:ला माफी दिल्यास अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच अशी घटना नाेंदविली जाईल. राष्ट्राध्यक्षांकडून स्वत:लाच माफी देण्याबाबत कायदेतज्ज्ञांमध्ये मात्र मतभिन्नता आहे.
भारताचा राष्ट्रध्वज दिसल्यावरून टीकाकॅपिटल इमारतीवर झालेल्या हल्ल्यादरम्यान एका निदर्शकाच्या हाती भारताचा राष्ट्रध्वज दिसला. केरळच्या एका समूहाने ट्रम्प यांना पाठिंबा देण्यासाठी निदर्शनात सहभाग घेतला हाेता. व्हिन्सेंट झेव्हीयर पलाथींगल यांनी या समूहाचे नेतृत्त्व केले हाेते. पाठिंबा देतांनाच काेणत्याही हिंसाचारात सहभागी नसल्याचे व्हिन्सेंट यांनी सांगितले. मात्र, शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी या प्रकाराचा तीव्र निषेध केला आहे. ही कृती लज्जस्पद असल्याचे चतुर्वेदी यांनी सांगितले. भाजप खासदार वरुण गांधी यांनीही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
आंदाेलकांवर गंभीर गुन्हेसंसदेवर हल्ला करणाऱ्या ९० हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. आणखी काही जणांना अटक हाेऊ शकते. यापैकी काही जणांवर राजद्राेहाचा गुन्हा दाखल करण्याची शक्यता आहे. याशिवाय इतरही गंभीर गुन्हे दाखल हाेऊ शकतात.