किव्ह : सध्या रशियाच्या ताब्यात असलेल्या खेरसन भागातील नोव्हा काखोव्का हे अतिशय महत्त्वाचे धरण मंगळवारी झालेल्या स्फोटानंतर उद्ध्वस्त झाले आहे. धरणावर हल्ला केल्याचा आरोप युक्रेन व रशियाने परस्परांवर केला असून तो दोघांनीही फेटाळला आहे. या धरणातील पाणी परिसरात शिरून पुराचा धोका निर्माण झाला आहे. धरणाजवळ राहणाऱ्या लोकांनी घरदार सोडून सुरक्षित ठिकाणी निघून जावे, अशा सूचना युक्रेन व रशियाने दिल्या आहेत.
गेल्या १६ महिन्यांपासून सुरू असलेल्या युक्रेन युद्धाला नोव्हा काखोव्का धरण उद्ध्वस्त झाल्याने वेगळे वळण लागले आहे. खेरसन भागात रशिया व युक्रेनच्या सैनिकांमध्ये धूमश्चक्री सुरू आहे. या दोघांपैकी नेमका कोणी या धरणावर हल्ला केला, याबद्दलचे कोणतेही ठोस पुरावे अद्याप उपलब्ध झालेले नाहीत. मात्र, धरण फुटून त्यातील पाणी परिसरात शिरल्याने युक्रेन व रशियाच्या हद्दीत पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका निर्माण झाला आहे. रशियाच्या सैन्याने मंगळवारी पहाटे हल्ला करून धरण उद्ध्वस्त केले, असा आरोप युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी केला. धरणाच्या झालेल्या नुकसानीमुळे झापोरिझ्झिया येथील अणू प्रकल्पालाही धोका निर्माण होऊ शकला असता; पण तेथील परिस्थिती नियंत्रणात आहे, असे युक्रेनने म्हटले आहे.
माेठे संकट निर्माण हाेण्याची भीती
नोव्हा काखोव्का धरण व तेथील जलविद्युतनिर्मिती प्रकल्प हल्ल्यात नष्ट झाले आहेत. त्यामुळे पूर आल्यास हजारो घरे, दुकाने, व्यावसायिक आस्थापनांचे तसेच पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हे धरण फुटल्यामुळे युरोपातील सर्वांत मोठ्या आकाराच्या अणुऊर्जा प्रकल्पाचे तापमान थंड राखण्यास मदत करणाऱ्या पाण्याची पातळी कमी होण्याची तसेच रशियाच्या ताब्यात असलेल्या क्रिमियाच्या दक्षिण भागात पिण्याचे पाण्याचे दुर्भिक्ष जाणवण्याची शक्यता आहे. (वृत्तसंस्था)
नागरिकांचे बळी जाण्याची भीती
नोव्हा काखोव्का धरण उद्ध्वस्त झाल्याने त्यातील १.८ कोटी घनमीटर पाणी परिसरातील गावांत शिरून शेकडो लोकांचे बळी जाऊ शकतात. त्यामुळे परिसरातील १०० गावे व शहरांत पूरस्थिती निर्माण होऊ शकते.
‘रशिया हा दहशतवादी देश’
- रशिया हा दहशतवादी देश असून त्याने युक्रेनमधील एक धरण हल्ला करून नष्ट केले आहे, असा आरोप युक्रेनने आंतरराष्ट्रीय न्यायालयात केला. २०१७ साली युक्रेनचा क्रिमिया हा भाग रशियाने बळकावला.
- त्याविरोधात युक्रेनने आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटला दाखल केला आहे. युक्रेनच्या हद्दीत केलेल्या हल्ल्यांबद्दल त्याला रशियाने भरपाई देण्याचा आदेश आंतरराष्ट्रीय न्यायालयाने द्यावा, अशी मागणी झेलेन्स्की सरकारने केली आहे.
- या न्यायालयात खटला सुरू असूनही त्याला न जुमानता रशियाने युक्रेनवर २४ फेब्रुवारी २०२२ रोजी आक्रमण केले. हे युद्ध कधी संपेल, याची काहीही शाश्वती नाही.