बगदाद : अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी इराकच्या दौ:यावर आले असून, त्यांच्या समोरच सुन्नी बंडखोरांनी महत्त्वाची ठाणी व विमानतळ ताब्यात घेत संपूर्ण उत्तर इराक आपल्या कब्जात घेतला.
केरी यांचा इराक दौरा गुप्त ठेवण्यात आला होता. केरी यांनी पंतप्रधान नूरी अल-मलीकी यांची भेट घेतली, तसेच ते इराकमधील सर्व पक्षांच्या राजकीय नेत्यांच्या भेटी घेतील. इराकला मदत करण्यासाठी अमेरिकेची काय योजना आहे, याची माहिती केरी सर्व नेत्यांना देतील. इराकी नेत्यांनी पुढे येऊन नवे सरकार बनवावे असा केरी यांचा प्रस्ताव आहे.
इराकचे सुरक्षा दल बंडखोरांच्या ताकदीसमोर कमी पडत असून, बंडखोरांनी आपले बळ एकवटत केरी यांच्यासमोर नवा प्रांत ताब्यात घेतला आहे. बंडखोरांच्या ताब्यातील पाच शहरांतून हजारो लोक विस्थापित होत असून, देश फुटण्याचा धोका उत्पन्न झाला आहे. 9 जून रोजी सुरू झालेल्या या आक्रमणात शेकडो इराकी सैनिक मरण पावल्याचे मलिकी यांच्या प्रवक्त्याने सांगितले.
जिहादीस्ट इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड द लेव्हंट- इसील या बंडखोर संघटनेने उत्तरेकडे आपले बळ एकवटले असून, शिया नागरिकांची मोठी संख्या असणारे तल अफार हे शहर व विमानतळ आज ताब्यात घेतले आहे. गेले काही दिवस या शहरासाठी संघर्ष चालला होता. तेथून सैनिक बाहेर पडताना दिसत आहेत. बंडखोरांचा नेता लेफ्ट. जनरल क्वासिम अट्टा याने टीव्हीवर ही घोषणा केली आहे. गेल्या आठवडय़ात बंडखोरांनी अंबर प्रांतातील रवा व अॅना ही शहरे ताब्यात घेतली होती. (वृत्तसंस्था)