पूत्रजया : इस्लामिक रिसर्च फाउंडेशनचा संस्थापक व वादग्रस्त धर्मोपदेशक डॉ. झाकीर नाईक याला भारतात पाठवण्यात येणार नाही, असे मलेशियाचे पंतप्रधान महातीर मोहम्मद यांनी म्हटले आहे. त्यामुळे झाकीर नाईकला भारतात आणण्याच्या प्रयत्नांना खीळ बसली आहे.जोवर झाकीर नाईक आमच्या देशात काही समस्या निर्माण करीत नाही, तोवर त्याचे भारताकडे प्रत्यार्पण करण्याचा मुद्दाच उपस्थित होत नाही. तो मलेशियाचा नागरिक आहे, असे महातीर यांनी स्पष्ट केले.द्वेष पसरविणारे व चिथावणीखोर भाषण देणाऱ्या झाकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनला भारतात २0१६ साली बेकायदेशीर घोषित करण्यात आले आहे. त्याच्यावर मनी लाँडरिंगचे व दहशतवादाचा पुरस्कार करण्याचे आरोप असून, एनआयए त्याचा शोध घेत आहे. त्याच्या प्रत्यार्पणासाठी भारताने मलेशियाकडे अर्जही केला आहे. (वृत्तसंस्था)
झाकीर नाईकला भारतात आणणे अशक्य; मलेशियाचा नागरिक - पंतप्रधान महातीर मोहम्मद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2018 1:37 AM