इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या शपथविधीला उपस्थित राहिल्याबद्दल आणि लष्करप्रमुखांची गळाभेट घेतल्यावरून काँग्रेसचे आमदार आणि माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांच्यावर सध्या टीकेची झोड उठली आहे. यामुळे मित्राच्या बचावासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान धावून आले असून सिद्धू हे शांतीदूत बनून आले होते. मात्र, काही जण या प्रयत्नांना नुकसान पोहोचवत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
गेल्या आठवड्यात इम्रान खान यांचा शपथिवधी झाला. यावेळी भारतातील तीन माजी खेळाडूंना निमंत्रण दिले होते. मात्र, भारतात टीकेला सामोरे जावे लागण्याच्या भीतीने दोघांनी पाकमध्ये जाणे टाळले होते. नवज्योतसिंग सिद्धू यांनी मात्र इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी पाकचे लष्करप्रमुख बाजवा यांची गळभेट घेतली होती. यावरून देशात भाजपकडून त्यांच्यावर टीका होत होती.
यावर इम्रान यांनी टीका केली आहे. सिद्धू यांना वाईट बोलणारे आशिया खंडातील शांततेच्या प्रयत्नांना मोठे नकसान करत आहेत. शांती शिवाय आपले लोक पुढे जाऊ शकत नाहीत. दोन्ही देशांना पुढे जाण्यासाठी काश्मीरसह आपले सर्व वाद संपवावे लागणार आहेत.
औरंगजेबच्या वडिलांचे मोदींना पत्रदरम्यान, काश्मीरमध्ये काही महिन्यांपूर्वी अपहरण करून हत्या करण्यात आलेला सैनिक औरंगजेब याच्या वडिलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून इम्रान यांच्याशी चर्चेची मागणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, दोन्ही देशांमध्ये असा समझोता व्हायला हवा की कोणीही मारला जाऊ नये. तसेच एकत्र विकास करावा. पाकच्या लष्करप्रमुखांनी आम्हालाही भेटायला हवे. इम्रान खान यांनी एक पाऊल आमच्यासाठी टाकले तर आम्हीही 100 पाऊले पुढे टाकू.