इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी अखेर आपल्या कार्यकाळात देश विनाशाच्या उंबरठ्यावर पोहोचल्याचे मान्य केले आहे. सरकारकडे देश चालवण्यासाठीही पैसा नाही, त्यामुळे परदेशात आपल्याला झोळी पसरावी लागते, अशी कबुली इम्रान खान यांनी दिली. एका कार्यक्रमात बोलताना इम्रान खान म्हणाले की, वाढती विदेशी कर्ज आणि कमी कर महसूल हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा बनला आहे, कारण सरकारकडे लोकांच्या कल्याणासाठी खर्च करण्यासाठी पुरेशी संसाधने नाहीत.
'ट्रिब्यून'च्या रिपोर्टनुसार, फेडरल बोर्ड ऑफ रेव्हेन्यूच्या (FBR) पहिल्या ट्रॅक अँड ट्रेस सिस्टम (TTS) च्या उद्घाटन समारंभाला संबोधित करताना इम्रान खान म्हणाले, "आमची सर्वात मोठी समस्या ही आहे की आमच्याकडे आपला देश चालवण्यासाठी पुरेसा पैसा नाही, ज्यामुळे आम्हाला कर्ज घ्यावे लागते". दरम्यान, TTS हे तंबाखू, खते, साखर आणि सिमेंट यासह गंभीर क्षेत्रातील उत्पादन आणि विक्रीचे इलेक्ट्रॉनिक निरीक्षण सुनिश्चित करेल. यामुळे व्यवस्थेत पारदर्शकता येण्यास मदत होईल आणि महसूल वाढेल, अशी पाकिस्तानला आशा आहे.
देशाच्या सध्याच्या आर्थिक स्थितीला आधीचे सरकार आणि त्यांचे मंत्री कुठेतरी जबाबदार आहेत, असे मत व्यक्त करायलाही इम्रान खान विसरले नाहीत. ब्रिटनचे उदाहरण देताना ते म्हणाले की, जेव्हा ब्रिटनचे मंत्री पाकिस्तानपेक्षा 50 पट अधिक उत्पन्न असलेले मंत्री परदेशात जाताना पाच तासांपेक्षा कमी कालावधीच्या फ्लाइटसाठी इकॉनॉमी क्लास वापरतात. जनतेचा पैसा ते वापरत आहेत हे त्यांना माहीत आहे. याउलट आधीच्या पाकिस्तानी नेत्यांनी यासाठी खूप पैसा खर्च केला होता.
'दूतावासात राहतात ब्रिटनचे पंतप्रधान'इम्रान खान पुढे म्हणाले की, ब्रिटनचे पंतप्रधान जेव्हा अमेरिकेला भेट देतात तेव्हा ते देशाचा पैसा वाचवण्यासाठी अमेरिकेतील ब्रिटनच्या दूतावासात राहतात. पण दुर्दैवाने पाकिस्तानात ही संस्कृती कधीच विकसित झाली नाही. आपल्या राज्यकर्त्यांनी लोकांना कर भरण्यास प्रोत्साहन देण्यासाठी कधीही उपाययोजना केल्या नाहीत. जनतेने प्रामाणिकपणे कर भरला तरच देश आर्थिक संकटातून बाहेर येऊ शकतो, असे या भाषणातून पंतप्रधान इम्रान खान यांनी एक प्रकारे सांगण्याचा प्रयत्न केला.