कराची : पाकिस्तानच्याइम्रान खान यांच्या सरकारने काही दिवसांतच अमेरिकेला शिंगावर घेतले आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ यांनी इम्रान यांना फोनवरून दहशतवाद्यांवर कडक कारवाई करण्याची सूचना केली होती. याची माहिती अमेरिकेने प्रसिद्धही केली होती. मात्र, पाकिस्तानने अमेरिकेकडून आलेल्या वक्तव्याचे खंडन केले असून याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे पॉम्पिओही आपल्या वक्तव्यावर ठाम राहिले आहेत.
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ हे सप्टेंबरमध्ये पाकिस्तानच्या दौऱ्यावर येणार आहेत . यापूर्वीच अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या वक्तव्यामध्ये पॉम्पिओ यांनी इम्रान खान यांना फोनवर शुभेच्छा दिल्याचे सांगितले. तसेच पाकिस्तानमध्ये सक्रीय असलेल्या दहशतवाद्याविरोधात कडक कारवाई करण्यासही सांगितले आहे, असे सांगण्यात आले होते.
यावर पाकिस्तानने नेहमीप्रमाणे अमेरिकेने असे काही आपल्याला सांगितलेच नसल्याचा कांगावा केला आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानेही याबाबत परिपत्रक जारी केले असून त्यामध्ये दोघांदरम्यानच्या संभाषणात कोठेही दहशतवाद्यांचा मुद्दा आला नसल्याचे सांगितले. अमेरिकेने केलेले वक्तव्य चुकीचे असल्याचेही मंत्रालयाच्या प्रवक्त्याने ट्विटरवर स्पष्ट केले आहे. यामध्ये अमेरिकेने दुरुस्ती करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.
मात्र, दुसरीकडे अमेरिकी मंत्रालयाच्या प्रवक्त्या हीथर नॉर्ट यांनी आम्ही या दाव्यावर ठाम असल्याचे सांगितले. तसेच या भागात पाकिस्तानचा अमेरिका हा एक महत्वाचा सहकारी आहे.