Imran Khan Arrested, Supreme Court of Pakistan: माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अटकेच्या घटनेपासून पाकिस्तानचे जनजीवन काहीसे विस्कळीत झाल्याचे दिसते. देशात सगळीकडे अराजकता आहे. त्यात आता इम्रान खान यांच्या अटकेने पाकिस्तानी लष्कराला मोठा धक्का बसला आहे. आज या प्रकरणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. इम्रान खान यांची अटक बेकायदेशीर असल्याचे सुप्रीम कोर्टाने सुनावणीदरम्यान सांगितले. न्यायालयाने म्हटले आहे की, इम्रान यांना अटक करण्यापूर्वी नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरोने (एनएबी) उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रारची परवानगी घ्यायला हवी होती, अशा शब्दांत फटकारले.
अर्जावर इस्लामाबादमध्ये सुनावणी होणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. एखाद्याला अशा प्रकारे अटक करता येईल का? यावर सांगताना, एनएबीने कायदा मोडून न्यायालयाचा अवमान केल्याचे पाकिस्तानचे सरन्यायाधीश म्हणाले. आता NAB काय करते ते न्यायालय लक्ष ठेवून असेल असेही सांगण्यात आले. त्याचवेळी ही बाब अत्यंत संवेदनशील असल्याचा युक्तिवाद नॅबच्या वतीने करण्यात आला.
अशाप्रकारे अटक होत राहिल्यास लोकांचा न्यायालयावरील विश्वास उडेल- सुप्रीम कोर्ट
या सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टानेही शाहबाज शरीफ सरकारवर कडक ताशेरे ओढले. सुप्रीम कोर्टाने पाकिस्तानच्या अॅटर्नी जनरलला सुनावणीदरम्यान पाचारण केले. आम्ही न्यायालयाचा सन्मान परत मिळवू, असे पाक सरन्यायाधीश म्हणाले. अशाप्रकारे अटक होत राहिल्यास लोकांचा न्यायालयावरील विश्वास उडेल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. कोर्टात प्रत्येकाचे संरक्षण करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सुनावले.
दरम्यान, पाकिस्तानात इम्रान खान यांच्या अटकेपासून सलग तीन दिवस जाळपोळ सुरू आहे. पाकिस्तानी लष्कराने हिंसाचारग्रस्त भागात आपले रोखकार्य कायम ठेवले आहे. आतापर्यंत 1 हजारांहून अधिक लोकांना हिंसेच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. इम्रान खान यांचा पक्ष पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) ने दावा केला आहे की, पोलिस आणि लष्कराच्या कारवाईत आतापर्यंत पक्षाच्या 47 कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला आहे.
इम्रान खान यांना कोणत्या प्रकरणात अटक?
अल कादिर ट्रस्ट प्रकरणात इम्रान खान यांना अटक करण्यात आली आहे. ही बाब विद्यापीठाच्या जमिनीशी संबंधित आहे. इम्रान खान पंतप्रधान असताना विद्यापीठाला कोट्यवधींची जमीन बेकायदेशीरपणे दिल्याचा आरोप आहे. पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मलिक रियाझ यांनी आरोप केला आहे की, इम्रान आणि त्यांच्या पत्नीने धमकावून कोट्यवधींची जमीन त्यांच्या नावावर केली आहे. हे विद्यापीठ 90 कोटींमध्ये उभारल्याचा दावा केला जात आहे, मात्र 6 वर्षात येथे केवळ 32 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला.