Imran Khan Arrest: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTI) पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांना काल(मंगळवारी) अटक करण्यात आली. त्यांना पाकिस्तानी निमलष्करी दलाकडून इस्लामाबाद उच्च न्यायालयातूनच ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या अटकेनंतर देशभरात खळबळ उडाली आहे. चौफेर आंदोलने आणि हिंसाचारही होत आहे. दरम्यान, लाहोरमध्ये ब्रिज स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गेलेल्या भारतीय खेळाडूंना तात्काळ पाकिस्तान सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
लाहोरमध्ये सुरू असलेल्या आशियाई आणि मध्य-पूर्व ब्रिज स्पर्धेत भाग घेण्यासाठी भारताचे 32 खेळाडू गेले होते. ही स्पर्धा 5 मे रोजी पाकिस्तानमध्ये सुरू झाली होती आणि ती 13 मे पर्यंत चालणार होती. भारतीय खेळाडू वाघा बॉर्डरवरून पाकिस्तानात दाखल झाले होते. पण आता भारतीय उच्चायुक्तालयाने त्यांना लाहोरहून तात्काळ भारतात परतण्यास सांगितले आहे.
पाकची कायदा आणि सुव्यवस्था ढासळलीपाकिस्तानमधील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडलेली दिसत आहे. इम्रान खान यांचा पक्ष पीटीआयचे कार्यकर्ते त्यांच्या नेत्याच्या अटकेपासून हिंसाचार करत आहेत. प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनीही अनेक ठिकाणी गोळीबार केला आहे. आंदोलक पोलिसांवरही बॉम्बने हल्ला करत आहेत. त्यामुळेच भारतीय खेळाडूंना तातडीने भारतात परतण्यास सांगण्यात आले आहे.
ब्रिज स्पर्धा पुढे ढकलणार?भारताव्यतिरिक्त पॅलेस्टाईन, सौदी अरेबिया, यूएई, जॉर्डन आणि बांगलादेशचे खेळाडूही पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या ब्रिज स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आले आहेत. जशी परिस्थिती पाकिस्तानात निर्माण झाली आहे, ते पाहिल्यानंतर ही स्पर्धा पुढे ढकलावी लागेल, असे वाटते.