पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTI) पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांना आज(मंगळवारी) अटक करण्यात आली. पाकिस्तानी निमलष्करी दलानं इस्लामाबाद उच्च न्यायालयातून त्यांना अटक आली. पाकिस्तानच्या इस्लामाबाद उच्च न्यायालयातून इम्रान खान यांच्या अटकेचे व्हिडीओ समोर आले होते. यात पाक रेंजर्सनं माजी पंतप्रधानांना ढकलून कारमध्ये बसवलं. त्यांच्या अटकेनंतर संपूर्ण पाकिस्तानात तणावाचं वातावरण आहे. तसंच पाकिस्तानात कलम १४४ लागू करण्यात आलंय.
एका दिवसापूर्वीच इम्रान खान यांनी देशाच्या लष्करावर त्यांच्या कथितरित्या हत्येचा कट रचण्याचा आरोप केला होता. आयएसआयच्या एका अधिकाऱ्यानं या आरोपांचं खंडन केलं होता. दरम्यान, इम्रान खान यांच्या अटकेनंतर पाकिस्तानात त्यांच्या समर्थकांद्वारे मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. तसंच आंदोलक पाकिस्तानी लष्कराचे कोअर कमांडर यांच्या घरातही शिरले. तर दुसरीकडे लाहोरशिवाय इम्रान खान यांच्या समर्थकांनी रावळपरिंडीतील लष्कराच्या मुख्यालयावरही हल्ला केला. त्यांना सोडण्यात येत नाही तोवर आपण या ठिकाणाहून जाणार नसल्याचा पवित्राही त्यांनी घेतल्याचं म्हटलं जातंय.
इम्रान खान यांच्या अटकेनंतर पाकिस्तानात कलम १४४ लागू करण्यात आलंय. याशिवाय लष्कराकडून गोळीबार करण्यात आला असून यात एका मुलाचा मृत्यू झाला असून चार अन्य लोकांनाही गोळ्या लागल्याचा दावा पीटीआयकडून करण्यात आलाय. तर दुसरीकडे आंदोलकांनी पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयच्या मुख्यालयावरही हल्ला केला. बलुचिस्तानातही आंदोलनादरम्यान पाकिस्तानी लष्करानं जनतेवर गोळीबार केल्याचं म्हटलं जातंय. आदोलकांनी रेडियो पाकिस्तानच्या पेशावरमधील इमरातीलाही आग लावली.