इस्लामाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी सात दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर असताना पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानही अमेरिकेमध्ये पोहोचले आहेत. अर्थव्यवस्था दिवाळखोरीत निघाल्याने त्यांच्याकडे स्वत:च्या विमाना नाही. यामुळे ते प्रवासी विमानाने निघणार होते. मात्र, सौदीच्या प्रिन्सने खान यांना विशेष अतिथी असल्याचे सांगत आपल्या विमानाने अमेरिकेला नेले.
अमेरिकेमध्ये संयुक्त राष्ट्रांची 74 वी महासभा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीही या सभेला उपस्थित राहणार आहेत. मात्र, न्युयॉर्कच्या विमानतळावर अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी दोघांचे स्वागत केले. इम्रान खानही सात दिवसांच्या दौऱ्यावर असून या काळात ते काश्मीरच्या 370 कलम हटविल्याच्या मुद्द्यावर सर्वांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत.
इम्रान खान 23 सप्टेंबरला राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भेटणार आहेत. तर नरेंद्र मोदी आणि इम्रान खान यांची 27 सप्टेंबरला महासभेवेळी भेट होणार आहे. यावेळी मोदी पहिले भाषण करणार असून इम्रान खान त्यानंतर सभेमध्ये बोलतील. यावेळी ते काश्मीर मुद्दा उठविणार असल्याचे समजते.
अमेरिकेला जाण्याआधी इम्रान खान काश्मीरमुद्द्यावर समर्थन मिळविण्यासाठी सौदी अरबच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी सलमान बिन अब्दुलाजिज अल सौद यांच्याशी चर्चा केली. यावेळी काश्मीरसह व्यापार, गुंतवणूक आणि आर्थिक संबंधांवरही चर्चा झाली.
दरम्यान, आज ह्युस्टनमध्ये होणाऱ्या हाऊडी मोदी कार्यक्रमाकडे भारत आणि अमेरिकेसह संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प एकत्र येणार असल्याने या कार्यक्रमाला विशेष महत्त्व आले आहे. दरम्यान, या कार्यक्रमाच्या वेळेविषयी सर्वांनाच उत्सुकता असून, भारतीय प्रमाणवेळेनुसार हा कार्यक्रम संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होणार आहे.