लाहोर : पाकिस्तानातील शाहबाज शरीफ यांच्या सरकारविरुद्ध लाँग मार्च काढताना शुक्रवारी माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताच्या करारीपणाची प्रशंसा केली. भारत कोणाचाही हस्तक्षेप सहन करत नाही हे सांगताना त्यांनी भारताच्या रशियाकडून तेल घेण्याच्या निर्णयाचे उदाहरण दिले. ते म्हणाले, भारत रशियाकडून तेल घेऊ शकतो; पण गुलाम पाकिस्तानींना घेता येत नाही.
रशिया स्वस्तात तेल देत असेल व देशहिताचा पर्याय आमच्याकडे असेल, तर आम्ही कोणालाही विचारू नये. दुसऱ्या देशाने आम्ही काय करावे हे आम्हाला सांगू नये. मात्र, पाकिस्तानी राज्यकर्ते गुलाम आहेत. ते जनतेच्या हिताचा निर्णय घेऊ शकले नाहीत, असा घणाघात त्यांनी केला.
इम्रान खान यांचा पक्ष पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफने (पीटीआय) शुक्रवारी सरकारच्या विरोधात लाहोर ते इस्लामाबाद असा लाँग मार्च काढला. या मार्चला ‘हकीकी आझादी मार्च’ असे नाव देण्यात आले असून, ४ नोव्हेंबरला तो राजधानी इस्लामाबादमध्ये पोहोचणार आहे. इम्रान यांच्या यापूर्वीच्या मार्चला इस्लामाबादेत हिंसक वळण लागले हाेते. ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन यावेळी इस्लामाबादेत माेठा बंदाेबस्त तैनात केला आहे. (वृत्तसंस्था)
इम्रान खान यांना म्हटले ‘घड्याळ चोर’पाकिस्तानच्या लाहोर शहरातील एका कार्यक्रमादरम्यान इम्रान खान यांना अचानक जमावाने घेराव घातला आणि त्यांच्याविरोधात ‘घड्याळ चोर’च्या घोषणा दिल्या. पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने २१ ऑक्टोबर रोजी तोशाखाना प्रकरणात इम्रान खान यांना ५ वर्षांसाठी अपात्र ठरवले होते. तसेच त्यांचे संसद सदस्यत्वदेखील रद्द करण्यात आले होते. सरकारविरोधी माेर्चाच्या तयारीसाठी ते लाहोर दौऱ्यावर होते. तेव्हा स्थानिक वकिलांनी त्यांना घेराव घालून ‘घड्याळ चोर’ अशा घोषणा दिल्या.