Imran Khan Bail: इम्रान खान यांना हाय कोर्टाकडून मोठा दिलासा, अल-कादिर ट्रस्ट प्रकरणात जामीन मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2023 04:11 PM2023-05-12T16:11:28+5:302023-05-12T16:11:49+5:30
Imran Khan Gets Bail: 'काहीही झाले तरी देश सोडणार नाही. हा माझा देश आहे, ही माझी जनता आहे.'- इम्रान खान
Imran Khan Bail: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पीटीआय प्रमुख इम्रान खान यांना शुक्रवारी (12 मे) इस्लामाबाद उच्च न्यायालयातून जामीन मिळाला. अल-कादिर ट्रस्ट प्रकरणात हायकोर्टाने त्यांना दोन आठवड्यांचा जामीन मंजूर केला. कोर्ट रूम नंबर 3 मध्ये सुनावणी झाली. कोर्टात सुनावणी सुरू असताना पीटीआय समर्थकांनी जोरदार गोंधळ घातला. इम्रान खान यांच्या खटल्याच्या सुनावणीसाठी तीन न्यायाधीशांचे खंडपीठ उपस्थित होते.
सुनावणीपूर्वी इम्रान खान पोलिस लाईन्समध्ये हजर होते. त्यांना कडक सुरक्षा व्यवस्थेत इस्लामाबाद न्यायालयात नेण्यात आले. इस्लामाबाद उच्च न्यायालयात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान, इम्रान खान यांच्या बेकायदेशीर अटकेविरोधात त्यांच्या समर्थकांनी इस्लामाबादचा श्रीनगर महामार्ग बंद केला होता.
हा देश माझा आहे - इम्रान खान
अल-कादिर ट्रस्ट खटल्याच्या सुनावणीदरम्यान इम्रान खान म्हणाले की, काहीही झाले तरी देश सोडणार नाही. हा माझा देश आहे, ही माझी सेना आहे, ही माझी जनता आहे. यापूर्वी इम्रान खान यांना मंगळवारी (9 मे) इस्लामाबाद उच्च न्यायालयातून पाक रेंजर्सच्या पथकाने अटक केली होती. अटकेनंतर निदर्शने सुरू झाली, पीटीआय कार्यकर्त्यांनी देशाच्या विविध भागात जाळपोळ केली. यानंतर काल सर्वोच्च न्यायालयाने इम्रान यांची अटक बेकायदेशीर ठरवत त्यांची सुटका करण्याचे आदेश दिले.