महिलांवरील अत्याचाराच्या, बलात्काराच्या आणि लैंगिक शोषणाच्या अनेक घटना या सातत्याने समोर येत आहेत. याच दरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Pakistan Imran Khan) यांनी पुन्हा एकदा एक वादग्रस्त विधान केलं आहे. बलात्काराच्या आणि अत्याचारांच्या घटनांचा संबंध हा थेट महिलांच्या कपड्यांशी जोडला आहे. अशा घटनेबाबत महिलांच्या कपड्याला दोष दिला आहे. इम्रान खान यांनी याआधीही असं विधान केलं होतं. त्यावेळी त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केल्याने ते परत वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. एका मुलाखतीत त्यांनी हे विधान केलं आहे.
"जर एखाद्या महिलेने फार कमी कपडे घातले असतील तर त्याचा पुरुषांवर परिणाम होतो. त्या रोबोट असल्यास हे घडणार नाही. ही फक्त कॉमन सेन्सची बाब आहे" असं इम्रान खान यांनी म्हटलं आहे. याआधीही इम्रान यांनी बलात्कारामागे बॉलिवूड, छोटे कपडे ही कारणं असल्याचं अनेकदा म्हटलं आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधानांचं हे विधान सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालं आहे. सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयीन आयोगाच्या दक्षिण आशियातील कायदेशीर सल्लागार रीमा ओमर यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे.
"पाकिस्तानमधील लैंगिक हिंसाचाराच्या कारणांबद्दल पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा एकदा पीडितेला दोष देणं हे अत्यंत निराशाजनक आणि घृणास्पद विधान आहे" असं रीमा ओमर यांनी म्हटलं आहे. डॉ. अर्सलान खालिद यांनी इम्रान खान यांची बाजू घेतली आहे. इम्रान यांच्या विधानाचा विपर्यास केला जात असल्याचं म्हटलं आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, पाकिस्तानमध्ये दररोज बलात्काराचे 11 गुन्हे दाखल होतात. तर गेल्या वर्षी जवळपास पोलिसांकडे याबाबत 22,000 तक्रारी आल्या होत्या. मात्र येथे पीडित महिलांना न्याय मिळणं खूप कठीण आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.