इमरान खान हे पाकिस्तानातील एकमेव असं व्यक्तिमत्त्व आहे, जे कायम चर्चेत असतं. इमरान खान जेव्हा क्रिकेट खेळत होते, तेव्हापासून त्यांची लोकप्रियता उत्तरोत्तर वाढतेच आहे. त्यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही लोकांच्या मनातली त्यांची प्रतिमा कायम राहिली. ‘चाॅकलेट हिरो’ म्हणून आजही लोक त्यांच्याकडे बघतात. त्यांच्या याच प्रतिमेचा त्यांना फायदा झाला. क्रिकेटमधली कारकीर्द त्यांनी गाजवली, तशीच राजकारणातली त्यांची कारकीर्दही अनेक कारणांनी गाजली. त्यांची ‘धडाकेबाज’ प्रवृत्ती लोकांनी कायमच उचलून धरली. त्यामुळेच राजकारणातील अल्प कालावधीतही ते थेट पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाच्या खुुर्चीवर जाऊन बसले.
अर्थात वाद आणि इमरान यांचं जणू समीकरणच आहे. त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीत, त्यानंतर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात, राजकारणात आणि अगदी पंतप्रधान झाल्यानंतरही आरोप आणि वाद-विवादांनी त्यांची पाठ कधी सोडली नाही. त्यांच्यावर आणि त्यांची पत्नी बुशरा बिबी यांच्यावर सत्तेचा दुरुपयोग केल्याचे आणि भ्रष्ट मार्गानं संपत्ती कमवल्याचे अनेक आरोपही झाले. याच आरोपाखाली दोघेही पती-पत्नी सध्या अटकेत आहेत. इमरान खान रावळपिंडी येथील तुरुंगात आहेत, तर बुशरा बिबी यांना त्यांच्या स्वत:च्या घरातच नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे. अर्थात तुरुंगातही इमरान खान स्वस्थ बसलेले नाहीत. त्यांनी लष्कराला धारेवर धरणं सोडलं नाही. आपल्या आणि पत्नीच्या हत्येचे सर्वतोपरी प्रयत्न होत आहेत, हे आरोपही ते नित्यनेमानं करीत आहेत. आपल्या पत्नीला विष पाजून मारले जाण्याचे प्रयत्न होताहेत हा आरोप तर ते सातत्यानं करीत आहेत.
दोन हजार कोटी रुपयांच्या घाेटाळ्याच्या संबंधित एका खटल्याची सुनावणीही सध्या सुरू आहे. या सुनावणीप्रसंगी न्यायाधीशांच्या समक्षच इमरान खान यांनी पुन्हा एकदा आरोप केला की लष्कर त्यांच्या पत्नीवर विषप्रयोगाचा सातत्यानं प्रयत्न करीत आहे. यावेळी तर बुशराला तिच्या जेवणात टॉयलेट क्लीनर मिसळून मारण्याचा प्रयत्न होतो आहे. त्यामुळेच बुशराचं सातत्यानं पोट दुखतं, पोटात, घशात, छातीत जळजळ होते.. विषप्रयोगाच्या या प्रयत्नांतूनच बुशराला या जगातून उठविण्याचा प्रयत्न होतो आहे, असा दावा त्यांनी केला. माझ्या पत्नीला काही झालं, तर लष्कराला आणि लष्करप्रमुख आसीम मुनीर यांना मी सोडणार नाही, असा दम द्यायलाही ते विसरले नाहीत.
आपल्याला विषप्रयोग करून मारण्याचा लष्कराचा आणि सरकारचा डाव आहे, असा आरोप खुद्द बुशरा बिबीही गेल्या काही दिवसांपासून करीत आहेत. आपल्या जिवाला धोका असल्यानं आपल्याला आपल्याच घरात नजरकैदेत न ठेवता सर्वसामान्यांप्रमाणे तुरुंगात ठेवावं अशी मागणीही बुशरा बिबी यांनी केली होती; पण त्यांची ही मागणी अमान्य करण्यात आली.
इमरान यांचं म्हणणं आहे, शौकत खान रुग्णालयाचे अधिकारी डॉ. असीम युसुफ यांनी बुशरा बिबी यांची आरोग्य तपासणी शिफा इंटरनॅशनल हॉस्पिटलमध्ये करावी असा सल्ला दिला होता, पण जेल प्रशासन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्येच तपासण्या करण्यासाठी हटून बसलं आहे. इमरान यांच्या आरोपानंतर न्यायालयानं दोघाही नवरा-बायकोची आरोग्य तपासणी करण्याचे आदेश तुरुंग प्रशासनाला दिले आहेत, मात्र त्याचवेळी माध्यमं, पत्रकारांशी बोलण्यालाही इमरान यांना मनाई केली आहे. पण इमरान यांचं म्हणणं आहे, माझ्या संदर्भात जाणूनबुजून चुकीच्या आणि खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत, त्या अफवांचं खंडन करण्यासाठीच मी मीडियाशी बोलतो!
तुरुंग प्रशासन अन्नात विष मिसळून मला मारण्याचा प्रयत्न करीत असल्याचं सिद्ध करण्यासाठीच मला खासगी हॉस्पिटलमधून चेकअप करवून घ्यायचं आहे, मात्र आपलं पितळ उघडं पडेल या भीतीनंच तुरुंग अधिकारी या गोष्टीला मान्यता देत नसल्याचं बुशरा बिबीचं म्हणणं आहे. माझ्या अन्नात रोज थोडे थोडे टॉयलेट क्लीनर मिसळून मला ठार मारण्याचा लष्कराचा नवा डाव मी कदापि यशस्वी होऊ देणार नाही, असा दावाही बुशरा बिबी यांनी केला आहे.
इमरान-बुशरा यांना ३१ व २१ वर्षे शिक्षाइमरान खान गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यापासून रावळपिंडी येथील अदियाला तुरुंगात आहेत. तोशाखानाप्रकरणी त्यांना तीन वर्षांची, तर त्यानंतर झालेला हिंसाचार, बेकायदेशीर निकाह आणि तोशाखाना प्रकरणाशी संबंधित आणखी एका घोटाळ्याप्रकरणी त्यांना एकूण ३१ वर्षांची शिक्षा झाली आहे. बुशरा बिबी यांनाही तोशाखाना आणि बेकायदा निकाहप्रकरणी २१ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. बनिगाला बंगल्यात त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे.