पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) विविध मुद्द्यांवरून चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा त्यांची जोरदार चर्चा रंगली आहे. त्यांचा एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्यांनी एका कार्यक्रमादरम्यान स्वत:लाच गाढवाची उपमा दिली आहे. "गाढव हा गाढवच राहतो" असं म्हटलं आहे. त्यांच्या या विधानाची सोशल मीडियावर नेटकरीही खिल्ली उडवत असून अनेक मजेशीर मीम्स व्हायरल झाले आहेत.
द सेंट्रम मीडिया नावाच्या यूट्यूब चॅनलच्या शो दरम्यान इम्रान खानपाकिस्तान आणि राजकारणावर बोलत होते. यावेळी त्यांना पाकिस्तानी लोक देश सोडून का जातात? असा प्रश्न विचारला. त्याला उत्तर देताना इम्रान यांनी स्वतःचे उदाहरण देत सांगितले की, "मी सुद्धा 20-30 वर्षे बाहेर होतो, क्रिकेट खेळायचो पण मला कधीच मी त्यांच्यातला वाटलो नाही, मी त्या समाजाचा एक भाग होतो आणि त्यांनी मला मनापासून स्वीकारले होते. ब्रिटीश समाजात अशा प्रकारे स्वीकारणारे फार कमी लोक आहेत. पण इतकं होऊनही मी ते घर कधीच मानलं नाही, कारण मी पाकिस्तानी होतो"
इम्रान य़ांनी "मला जे हवं होतं तेच मी करत होतो, कारण मला माहिती होते मी इंग्रज होऊ शकत नाही. जर तुम्ही गाढवावर पट्टे ओढले तर गाढवाचा झेब्रा होऊ शकत नाही. गाढव ते गाढवच राहील" असं म्हणत स्वतःची तुलना चक्क गाढवाशी केली. इम्रान खान यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून अनेक जण यावर गंमतीशीर प्रतिक्रिया देत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.