Imran Khan Row: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी एक मोठा दावा केला आहे. कोर्टातच माझी हत्या करण्याचा कट रचला गेला होता. पण मी त्यातून बचावलो, असे इम्रान खान यांनी म्हटले आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी असताना विदेशी राजकीय नेत्यांकडून मिळालेल्या सरकारी भेटी वैयक्तिक स्वार्थासाठी विकल्याप्रकरणी कोर्टाने इम्रान खान यांच्या अटकेचा आदेश दिला होता.
पाकिस्तान सरकारने इम्रान खान यांच्यावर विविध गुन्हे दाखल केले आहेत. तोशाखान प्रकरणी सुनावणीकरिता इस्लामाबाद कोर्टात उपस्थित राहिले होते. यानंतर इम्रान खान यांनी ट्विट करत माझी हत्या होऊ शकते, असा दावा केला आहे. पाकिस्तानच्या सरन्यायाधीशांनी देशात आताच्या घडीला काय परिस्थिती आहे, यावर लक्ष दिले पाहिजे. अटक करून मला तुरुंगात डांबल्यास त्याचा निवडणुकांवर काही परिणाम होणार नाही. कोर्टात सुनावणीवेळी योग्य सुरक्षा व्यवस्था करण्यात आलेली नव्हती. माझ्या हत्येचा कट रचण्यात आला होता. मात्र, यामागे कोण आहे, याचा पर्दाफाश करेन. कोर्टातच हत्या करण्याचे कारस्थान करण्यात आले होते. पण त्यातून मी वाचलो, असे इम्रान खान यांनी म्हटले आहे.
दरम्यान, जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यामुळे व्हिडिओ लिंक द्वारे कोर्टात बाजू मांडण्याची मुभा द्यायला हवी होती. मात्र, प्रत्यक्ष कोर्टात हजर राहण्यास सांगण्यात आले, याबाबत इम्रान खान यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"