इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये राजकीय नाट्य रंगले असून पंतप्रधान इम्रान खान विरोधकांच्या चेंडूवर क्लीन बोल्ड होण्याची शक्यता आहे. त्यांचे मित्रपक्ष मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंट - पाकिस्तान (एमक्यूएम-पी) या पक्षाने पाठिंबा काढत विरोधीपक्षांशी हातमिळवणी केल्याने इम्रान सरकार कोसळणार अशी चर्चा सुरू आहे. सात खासदार असलेल्या या पक्षाने अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान करण्याचे ठरविले आहे. या महत्त्वाच्या घटनेमुळे इम्रान खान यांचे सरकार अल्पमतात गेले आहे. आता ते अविश्वास प्रस्तावावरील मतदानानंतर, की त्याच्या आधीच पंतप्रधानपदाचा राजीनामा देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एमक्यूएम-पी या पक्षाच्या प्रवक्त्याने सांगितले की, विरोधी पक्ष पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीत मांडणार असलेल्या अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान करण्याचे आम्ही ठरविले आहे. (वृत्तसंस्था)
अविश्वास ठरावावर सोमवारी किंवा मंगळवारी नॅशनल असेंब्लीमध्ये मतदान होण्याची शक्यता आहे. मात्र, तिथे पराभव होण्याच्या आधीच मित्रपक्ष एमक्यूएम-पी या पक्षाने पाठिंबा काढून घेतल्याने इम्रान खान यांचे सरकार अल्पमतात गेले आहे. अविश्वास ठरावावरील मतदानाच्या वेळी जमात-ए-इस्लामी या पक्षाने तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे.
माझे सरकार पाडण्याचा कट विदेशी शक्तींनी आखला आहे, या आरोपाचा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पुनरुच्चार केला आहे. इम्रान यांनी एक पत्र पुरावा म्हणून मंत्रिमंडळातील सहकारी व पाकिस्तानातील काही वरिष्ठ पत्रकारांना दाखविले. मात्र, त्या पत्रात नेमका काय तपशील आहे, ती विदेशी शक्ती म्हणजे नेमके कोणते देश, याचा तपशील इम्रान खान यांनी मंत्रिमंडळातील सहकारी, लष्करातील उच्चपदस्थ वगळता अन्य कोणाकडेही उघड केलेला नाही.
संदेश देण्याचा निर्णय रद्द सरकार अल्पमतात गेल्याने पंतप्रधान इम्रान खान यांची बुधवारी पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांनी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. इम्रान खान दूरचित्रवाहिनीवरून बुधवारी संध्याकाळी पाच वाजता राष्ट्राला उद्देशून संदेश देणार होते. मात्र, त्यानंतर संदेश न देण्याचा निर्णय पंतप्रधान इम्रान खान यांनी घेतला.
बहुमतासाठी हवा १७२ सदस्यांचा पाठिंबापंतप्रधान इम्रान खान हे पाकिस्तान तहरीक - ए - इन्साफ (पीटीआय) या पक्षाचे प्रमुख आहेत.