पेशावर : पाकिस्तानमध्ये नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये पाकिस्तान तहरीक ए इंसाफ (पीटीआई) पक्षाचे अध्यक्ष व माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांना निवडणूक आयोगाने संसदेच्या सदस्यत्वाची शपथ घेण्यास सशर्त परवानगी दिली आहे. इम्रान खान यांनी पाच मतदारसंघांमधून निवडणूक लढविली होती. यापैकी इस्लामाबाद-2 आणि लाहोर-9 या दोन जागांवरील निकाल आयोगाने राखून ठेवले आहेत. इम्रान खान यांनी येत्या 11 ऑगस्टला पंतप्रधान पदाची शपथ घेण्याचे जाहीर केले होते. आयोगाच्या निर्णयामुळे हा शपथविधी पुढे ढकलला जाण्याची शक्यता आहे. भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणामध्ये मंगळवारी इम्रान खान हे एसीबी समोर हजर झाले होते. त्यांच्यावर खैबर पख्तुन्वा प्रांताच्या निधीतून 21.7 लाखांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. नॅशनल अकाऊंटबिलिटी ब्युरोने (नॅब) त्यांना दोनदा समन्स पाठिवले होते. मात्र, इम्रान खान गैरहजर राहिले होते. त्यांच्या वकिलाने 7 ऑगस्टची वेळ मागून घेतली होती. इम्रान खान यांनी 2013 मध्ये खैबर पख्तूनवा प्रांतामध्ये सरकार स्थापन केले होते. या दरम्यान त्यांनी खासगी वापरासाठी 72 तास सरकारी हेलिकॉप्टरचा वापर केला होता. या प्रकरणातच नॅबने त्यांच्याकडे खुलासा मागिवला होता. नॅबचा आरोप आहे की, खासगी वापरासाठी ते सरकारी हेलिकॉप्टर वापरू शकत नव्हते. यामुळे सरकारी खजिन्याचे नुकसान झाले आहे.
सध्या या प्रकरणाची सुनावणी प्रलंबित असल्याने निवडणूक आयोगाने इम्रान खान यांना पाचपैकी तीन मतदारसंघात सशर्त विजयी घोषित करत सदस्यत्वाची शपथ घेण्यास परवानगी दिली आहे.