नवी दिल्ली - पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पंतप्रधाननरेंद्र मोदींबद्दल केलेल्या विधानावरुन सोशल मीडियावर त्यांना चांगलंच ट्रोल करण्यात येत आहे. आपल्या ज्ञानातून त्यांनी मोदींवर केलेल्या टीकेचा नेटीझन्सने समाचार घेतल्याचं दिसून येते. इम्रान खान यांनी एका मुलाखतीत मोदींबद्दल बोलताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रायलला गेले, त्यानंतर त्यांनी देशातील कलम 370 हटवले, असे खान यांनी म्हटलं आहे. खान यांच्या या उत्तरामुळे ते ट्रोल होताना दिसत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2017 मध्ये इस्रायलचा दौरा केला होता. त्यानंतर, जवळपास 2 वर्षांनी जम्मू आणि काश्मीरमधून कलम 370 हटविण्यात आले आहे. मात्र, पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी दावा करताना, मोदींनी इस्रायलचा दौरा करुन येताच विशेष अधिकार असलेले कलम 370 हटविल्याचे म्हटले आहे. भारत आणि इस्रायलची खास मैत्री असल्याचंही खान यांनी म्हटलं आहे. काश्मीरच्या नावाखाली भारत आणि इस्रायल यांना टार्गेट करण्याचा खान यांचा हेतू स्पष्टपणे दिसत आहे. पण, मुलाखतीतील या उत्तरातून ते आता चांगलेच फसले आहेत.