नुकतेच पाकिस्तानच्या नॅशनल असेंबलीत (संसद) अविश्वास प्रस्ताव मंजूर झाला आणि दुसऱ्या क्षणी इम्रान खान यांचे सरकार कोसळले. सत्तास्थापनेच्या साडेतीन वर्षानंतर इम्रान खान सत्तेच्या खुर्चीवरून उतरले. पंतप्रधानपदाच्या खुर्चीवरून पायउतार झाल्यानंतर आता इम्रान खान हे लोकांमध्ये जाऊन सभा घेऊन आपला जनाधार वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे इम्रान खान यांची माजी पत्नी रेहम खान यांनी त्यांना कपिल शर्माच्या कॉमेडी शोमध्ये जाण्याचा सल्ला दिला आहे.
रेहम खान यांनी इम्रान खान यांच्यावर भाष्य करताना म्हटले की, "त्याच्याकडे विनोदी प्रतिभा आहे आणि मी सुचविते की ते 'द कपिल शर्मा शो'मध्ये नवज्योत सिंग सिद्धू यांची जागा घेऊ शकतात." दरम्यान, संपूर्ण राजकीय संकटाच्या काळात रेहम खान यांनी सतत इम्रान खान यांना यांच्यावर निशाणा साधला होता. रेहम खान यांनी इम्रान खान यांना 'मिनी ट्रम्प' म्हणत पुन्हा हल्लाबोल केला.
एका पाकिस्तानी रिपोर्टरशी बोलताना रेहम खान यांनी इम्रान खान यांची खिल्ली उडवली आणि त्यांनी बॉलीवूडमध्ये हात आजमावून पाहिले पाहिजे, असे सांगितले. यादरम्यान रेहम खान यांनी इम्रान खान यांच्या विधानाचा संदर्भ दिला. ज्यामध्ये इम्रान खान यांनी भारताचे कौतुक केले होते आणि म्हटले की "कोणतीही महासत्ता भारतासाठी अटी घालू शकत नाही".
रेहम खान म्हणाल्या, "इम्रान खान यांना बॉलिवूडमध्ये संधी दिली पाहिजे. त्याच्याकडे विनोदी प्रतिभा चांगली आहे. द कपिल शर्मा शोमध्ये पाजी (नवज्योत सिंग सिद्धू) ची जागा रिक्त आहे, त्यामुळे इम्रान खान त्यांची जागा घेऊ शकतात. त्यांची पाजीशीही चांगली मैत्री आहे आणि आता इम्रान खान यांनी सुद्धा कविता करायला सुरुवात केली आहे."
बॉलीवूडमध्ये नायक की खलनायक?इम्रान खान यांनी बॉलीवूडमध्ये नायकाची भूमिका साकारावी की खलनायकची? या प्रश्नावर रेहम खान म्हणाल्या की, "हे त्यांच्यावर अवलंबून आहे, परंतु मला वाटते की त्यांच्याकडे विनोदी प्रतिभा देखील आहे. कुठे काही झाले नाही तर ते कपिल शर्माच्या शोमध्ये जाऊ शकतो." यानंतर रिपोर्टरने असेही म्हटले की, कपिल शर्मा, मला खात्री आहे की तू रेहमचे ऐकत आहेस.