इस्लामाबाद : तेहरीक-ए-इन्साफ पक्षाचे प्रमुख इम्रान इम्रान खान यांची पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी निवड करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या ‘नॅशनल अॅसेंब्ली’मध्ये शुक्रवारी मतदान झाले. यावेळी इम्रान खान यांना बहुमत मिळाले. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार शहाबाज शरीफ यांचा पराभव केला. इम्रान खान यांना 176 मते मिळाली, तर शहाबाज शरीफ यांना 96 मते मिळाली. दरम्यान, ‘नॅशनल अॅसेंब्ली’मध्ये पंतप्रधानपदी निवडून येण्यासाठी सदस्याला 172 मते मिळवावी लागतात.
पाकिस्तानच्या संसदीय निवडणुकीत कोणालाच बहुमत मिळाले नसले तरी सर्वाधिक जागा मिळालेल्या ‘पाकिस्तान तहरीक-ए- इन्साफ’ (पीटीआय) पक्षाने बहुमताचे गणित जुळविण्यासाठी अपक्ष व अन्य छोट्या पक्षांशी बोलणी करावी लागली होती. या निवडणुकीत इम्रान खान यांच्या ‘पीटीआय’ पक्षाला 123 जागा मिळाल्या होत्या. त्या प्रमाणात त्यांना आता आणखी 33 राखीव जागा मिळाल्याने पक्षाची सदस्यसंख्या 158 वर पोहोचली होती. स्पष्ट बहुमतासाठी आवश्यक असलेला किमान 172 चा आकडा गाठण्यासाठी इम्रान खान यांना आता फक्त 14 बाहेरच्या सदस्यांचा पाठिंबा घ्यावा लागणार होता.
दरम्यान, इम्रान खान यांच्याकडून शपथविधीच्या कार्यक्रमासाठी नवज्योत सिंग सिद्धू पाकिस्तानात पोहोचले आहेत. त्यांनी शुक्रवारी अटारी-वाघा बॉर्डरवर पोहोचल्यानंतर मीडियाशी बोलताना सांगितले की,‘मी एक सदिच्छ दूत म्हणून पाकिस्तानला जात आहे. दोन्ही देशांमधील संबंध सुधारतील या अपेक्षेने मी जात आहे’.