पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचे (पीटीआय) अध्यक्ष इम्रान खान तुरुंगात जाण्याच्या भीतीने धास्तावले आहेत. शनिवारी प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. लाहोरमधील शौकत खानम रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली. इम्रान खान यांनी सतत पोटात दुखत असल्याची तक्रार केली आणि तत्काळ वैद्यकीय मदत घेण्याची मागणी केली.
पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास चार तास थांबल्यानंतर पीटीआय नेते इम्रान खान रुग्णालयामधून बाहेर पडले आणि आपल्या घरी परतले. माजी क्रिकेटपटू ते राजकारणी बनलेले इम्रान खान यांना शुक्रवारी दुपारपासून अस्वस्थ वाटत होते. अस्वस्थ झाल्यावर त्यांना कडक सुरक्षेत रुग्णालयात नेण्यात आले. शनिवारी पहाटे रुग्णालयात पोहोचल्यानंतर विशेष डॉक्टरांच्या पथकाने इम्रान खान यांची आरोग्य तपासणी केली. त्यांच्या पोटाच्या समस्येचे कारण शोधण्यासाठी डॉक्टरांनी अनेक तपासण्या केल्या.
दरम्यान, 9 मे रोजी पाकिस्तानच्या शेहबाज सरकारने अल-कादिर ट्रस्ट प्रकरणी इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या (IHC) परिसरातून इम्रान खान यांना अटक केली होती. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने त्यांची अटक बेकायदेशीर घोषित करेपर्यंत ते काही दिवस कोठडीत होते. सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर त्यांना आयएचसीसमोर हजर करण्यात आले आणि 12 मे रोजी त्यांच्याविरुद्धच्या सर्व खटल्यांमध्ये दोन आठवड्यांसाठी जामीन मंजूर करण्यात आला.