इस्लामाबाद : क्रिकेटच्या मैदानावर अष्टपैलू खेळ आणि धूर्त चालींनी प्रतिस्पर्धी संघाची भंबेरी उडवणाऱ्या इम्रान खान यांनी रविवारी पाकच्या नॅशनल असेम्ब्लीमध्ये अफलातून राजकीय खेळी करीत विरोधकांना त्रिफळाचीत केले. अविश्वास ठराव मांडून इम्रान खान यांना पंतप्रधानपदावरून हटविण्याचा विरोधकांचा डाव इम्रान यांनी उधळून तर लावलाच शिवाय झटपट निर्णय घेत नॅशनल असेम्ब्ली बरखास्त करत येत्या तीन महिन्यांत मध्यावधी निवडणुका घेण्याचा इरादाही जाहीर केला. यामुळे भांबावलेल्या विरोधकांनी थेट सुप्रीम कोर्टात धाव घेत ‘डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम’ अर्थात डीआरएसची मागणी केली आहे.
सरकारवरील अविश्वास ठराव रविवारी नॅशनल असेम्ब्लीमध्ये मांडण्यात आला. मात्र, हा विदेशी शक्तींचा डाव असल्याचे कारण देत उपसभापती कासीम खान सुरी यांनी ठराव फेटाळून लावला. त्यानंतर इम्रान यांनी मध्यावधी निवडणुका घेण्याची केलेली शिफारस अध्यक्ष अरीफ अल्वी यांनी मान्य केली. नॅशनल असेम्ब्ली बरखास्त करण्यात आली असून आता तीन महिन्यांच्या आत सार्वत्रिक निवडणुका घ्याव्या लागतील. तोपर्यंत इम्रान खान काळजीवाहू पंतप्रधान म्हणून काम पाहतील.
३४२ सदस्य असलेल्या नॅशनल असेम्ब्लीमध्ये अविश्वास ठराव संमत होऊन इम्रान यांना राजीनामा द्यावा लागणार, असे सर्व जण गृहीत धरून चालले होते. मात्र, प्रत्यक्षात उलट घडल्याने विरोधक स्तंभित झाले. असेम्ब्लीचे सभापती असद कैसर यांच्याविरोधातही विरोधी पक्षांनी अविश्वास ठराव दाखल केला होता. त्यामुळे उपसभापती कासीम खान सुरी यांच्याकडे कामकाजाची सूत्रे देण्यात आली. उपसभापतींनी अविश्वास ठराव फेटाळून लावत सर्व प्रकरणाला कलाटणी दिली. (वृत्तसंस्था)
सुप्रीम कोर्टात धाव- इम्रान यांच्या खेळीने भांबावलेल्या विरोधकांनी इम्रान सरकारचा निर्णय घटनाबाह्य असल्याचे सांगत आदळआपट सुरू केली. काहींनी पार्लमेंटच्या बाहेरच धरणे आंदोलन सुरू केले. - काही खासदारांनी थेट सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागण्याचा निर्णय घेतला. सर्व घटनांवर लक्ष ठेवून असलेल्या सर्वोच्च न्यायालयानेही स्वत:हून या राजकीय घडामोडींची दखल घेत सुनावणी सुरू केली. त्यानंतर सोमवारपर्यंत सुनावणी स्थगित करण्यात आली.- या घडामोडींवर लष्कराने मौन बाळगले. सरकारवरील अविश्वास ठराव फेटाळला गेल्यानंतर घडलेल्या घडामोडींशी काहीही संबंध नसल्याचे पाकिस्तानी लष्करातर्फे स्पष्ट करण्यात आल्याने गोंधळात भर पडली आहे.
पाकिस्तानने आता मध्यावधी निवडणुकांसाठी सज्ज व्हावे. भ्रष्टाचारी प्रवृत्तींच्या हाती आम्ही या देशाचे भविष्य सोपविणार नाही. लवकरच जनतेच्या दरबारात जाऊन आम्ही त्यांच्याकडे मतांचा जोगवा मागू.- इम्रान खान